रामनाथी (गोवा) – संत, ऋषि, वेद, पुराणे यांच्या, तसेच भगवान शिवाच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे. आज अन्य पंथीय त्यांचा पंथ मानतात; पण हिंदू मात्र स्वधर्म मानत नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येकाचे चिंतन आणि आत्ममंथन होऊन बौद्धिक सुस्पष्टता असणे, तसेच धर्माची अवधारणा स्पष्ट असणे आवश्यक आहे. देशातील हिंदू कुपमंडूक वृत्तीचे झाले आहेत. देशांतर्गत आणि देशाबाहेरून अशा सर्वच मार्गांनी आक्रमणे होत असतांना सर्वांमध्ये अध्यात्माद्वारे क्षात्रतेज जागृत व्हायला हवे. त्यासाठी हिंदूंनी स्वकर्तेपणा त्यागून अधर्माच्या विरोधात कार्य करायला हवे. स्वतःतील तेज जागृत करून पुढे गेल्यास अंधःकार नष्ट होऊ शकतो. त्यामुळे हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्वात सर्वत्र हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे मार्गदर्शन श्री लालेश्वर महादेव मंदिर, बिकानेर (राजस्थान) येथील महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी केले. ते येथे आज आरंभ झालेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते.