१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची फलनिष्पत्ती
गत सहा हिंदू अधिवेशनांच्या माध्यमातून आपण हिंदु समाजातील विविध घटकांना संघटित करण्यासाठी विविध कृती कार्यक्रमाचे नियोजन केले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्याचेच फलित म्हणजे या व्यासपिठाच्या अंतर्गत उद्योगपती, विचारवंत, लेखक, पत्रकार इत्यादी हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवणारे अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटित होत आहेत.
१ अ. अधिवक्त्यांच्या संघटनासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना
सहा वर्षांपूर्वी हिंदु समाजातील विविध घटकांच्या संघटनाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून आपण हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना केली होती. ही परिषद स्थापन झाली, त्या वेळी अधिवेशनाला उपस्थित ७ – ८ अधिवक्त्यांपासून या कार्याचा आरंभ झाला. मागील दोन दिवसांत हिंदु विधीज्ञ परिषदेने या सभागृहातच आयोजित केलेल्या अधिवक्ता अधिवेशनाला ८ राज्यांतील ८० अधिवक्ते सहभागी झाले होते. हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे व्रत घेऊन आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय बाळगून हे अधिवक्ते कार्य करत आहेत. या कार्याचा झंझावात निर्माण झाल्याचा अनुभव आपणाला लवकरच येईल.
२. भावी संघटनात्मक कार्याची दिशा
हिंदु राष्ट्राविषयी श्रद्धा बाळगणार्या समविचारी हिंदूंचे संघटन करण्यासाठी विविध घटकांना संघटित करणारी व्यासपिठे निर्माण करायची आहेत. या दिशेनेच या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या साक्षीने दोन पावले पुढे टाकणार आहोत.
२ अ. आपत्तींत सापडलेल्या हिंदूंना साहाय्य करण्यासाठी आरोग्य साहाय्यता समिती या संघटनेची स्थापना
मागील सहा अधिवेशनांमध्ये आपत्काळात हिंदूंना साहाय्य करण्यासाठी काय करता येईल ?, या दृष्टीने वेळोवेळी विचार केला. या दिशेने एक ठोस पाऊल म्हणून विविध आपत्तींत सापडलेल्या हिंदूंना साहाय्य करण्यासाठी आज आपण आरोग्य साहाय्यता समिती या संघटनेची स्थापना करणार आहोत. आधुनिक वैद्य (डॉक्टर्स), वैद्य, परिचारका, पॅथॉलॉजिस्ट, अशा वैद्यकीय क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती या संघटनेच्या माध्यमातून कार्य करतील. ही संघटना केवळ आपत्तीच्या वेळीच कार्यरत असेल, असे नाही, तर भारतातील आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठीही ती कार्य करील.
२ आ. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यात साहाय्य करण्यासाठी उद्योगपती परिषदेची स्थापना
या अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांसह उद्योगपतीही मोठ्या संख्येने सहभागी होतात. हिंदु धर्म, समाज आणि हिंदूंच्या संघटना यांच्यासाठी त्यागाची भावना असलेले शेकडो उद्योगपती प्रत्येक शहरात आहेत; मात्र ते विखुरलेले आहेत. मागील दोन वर्षांपासून अशा उद्योगपतींचे संघटन करण्यासाठी एक व्यासपीठ स्थापन होण्याची आवश्यकता भासत होती. या अधिवेशनाच्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. आरोग्य-क्षेत्रात कार्य करण्यासाठी आरोग्य साहाय्य समितीची स्थापना झाल्यानंतर आता उद्योगपतींची संघटना स्थापन करत आहोत. उद्योगपती परिषद असे या संघटनेचे नाव आहे.
उद्योगपती परिषदेचे मुख्य ध्येय हिंदुत्वाच्या कार्याचे रक्षण, पोषण आणि अंतिमतः हिंदु राष्ट्राची स्थापना, हे असेल. हिंदुत्वाचे कार्य करणार्या संघटना, व्यक्तीगत स्तरावर कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ आदींना धर्मकार्यासाठी साहाय्य करणे, तसेच हिंदुत्वाचे कार्य करतांना शारीरिक इजा पोहोचलेल्या हिंदुत्वनिष्ठांना औषधोपचारासाठी अर्थसाहाय्य देणे आणि हिंदुत्वाचे कार्य करतांना हौतात्म्य पत्करलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या नातेवाईकांना साहाय्य करणे, हे या परिषदेचे कार्य असेल. उद्योगपती परिषदेच्या माध्यमातून उद्योगपतींचे संघटन करण्यासाठी श्री. खेमका हे पूर्व भारताचे, श्री. संजीव कुमार उत्तर भारताचे आणि श्री. दिनेश एम्.पी. हे दक्षिण भारताचे दायित्व सांभाळणार आहेत.
या दोन्ही संघटनांचे कार्य आणि मनुष्यबळ यांच्या दृष्टीने उत्तरोत्तर वृद्धी व्हावी, यासाठी सर्वांनी साहाय्य करावे.
– श्री. नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती