बांगलादेश आणि पाकिस्तान येथे जाऊनही हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची सिद्धता !
सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाचे प्रथम सत्र
रामनाथी (गोवा) : बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा संपवून भाग्यनगर येथे परत जात असतांना माझ्या गाडीवर मोठी चारचाकी गाडी घालून मला ठार मारण्याचा प्रयत्न झाला; मात्र ‘जो धर्माचे काम करतो त्याचे रक्षण स्वत: ईश्वर करतो’, ही अनुभूती मी घेतली. या आक्रमणात मी पूर्णत: सुरक्षित राहिलो. किड्या-मुंगीप्रमाणे जगण्याला काही अर्थ नसतो, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे जीवन जगले पाहिजे. युवकांनी ‘अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच जगेन आणि मरेन, असा निर्धार करावा’, असे स्फूर्तीदायी आवाहन भाग्यनगर येथील भाजपचे आमदार तथा श्रीराम युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन करण्याची आवश्यकता’ या विषयावर बोलत होते. या वेळी त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तुमचे राज्य, क्षेत्र येथे हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करा. केवळ येथेच नाही, तर बांगलादेश आणि पाकिस्तान येथे जाऊनही सभा घेण्यास मी सिद्ध आहे’, अशीही गर्जना केली.
आमदार टी. राजासिंह पुढे म्हणाले,
१. कोणताही राजकीय नेता आणि पक्ष यांच्यामागे धावू नका. प्रत्येक पक्षाला त्याच्या मर्यादा आहेत. युवकांनी हिंदु जनजागृती समितीसारख्या संघटनांशी जोडून घेऊन कार्य केले पाहिजे. या अधिवेशनातून काहीतरी शिकून जा आणि काहीतरी कृती करण्याचा निश्चय करा.
२. धर्मांधांची आक्रमक वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षण शिकून घेण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली आहे.
वर्ष २०१९ पूर्वी श्रीराम मंदिर न बांधल्यास भाजपचा त्याग ! – आमदार टी. राजासिंह
भाजप सत्तेवर येऊन ४ वर्षे झाली; मात्र श्रीराम मंदिराची उभारणी, ३७० कलम रहित करणे, समान नागरी कायदा करणे, यातील एकही गोष्ट साध्य होतांना दिसत नाही. त्यामुळे वर्ष २०१९ पूर्वी हिंदुहिताचे निर्णय न घेतल्यास आणि श्रीराम मंदिर न बांधल्यास भाजपचा त्याग करू आणि प्रसंगी स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवू, अशी चेतावणी आमदार श्री. टी. राजासिंह यांनी या वेळी दिली.
१. १०० कोटी लोकांमधून देवाने आपलीच का निवड केली आहे, हे लक्षात घेऊन धर्मकार्य आणि देशकार्य करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. धर्मकार्य करतांना अडथळे हे येणारच आहेत, हे अडथळे म्हणजे देवाने आपली घेतलेली परीक्षा आहे. या परीक्षेत आपण उत्तीर्ण होणारच, याची खात्री बाळगा.
२. हिंदु जनजागृती समितीने ८ भाषांत १४ राज्यांत १ सहस्र ४०० पेक्षा अधिक हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केल्या असून हा विषय १६ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. मी २५ हून अधिक सभांना उपस्थित होतो. प्रत्येक सभेत तरुणांमधील उत्साह पहायला मिळाला. मालेगाव येथील हिंदु धर्मजागृती सभा अभूतपूर्व झाली. ७० टक्के धर्मांध असलेल्या या शहरात सभा न होण्यासाठी पोलिसांचा प्रचंड दबाव होता; मात्र असे असतांना १५ सहस्र युवकांनी उपस्थिती दर्शवून ही सभा यशस्वी केली. यानंतर बीड येथे झालेली सभाही कोणत्याही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्या राजकीय पक्षांचे साहाय्य नसतांना केवळ धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीमुळे अभूतपूर्व झाली.