- महामार्गासाठी मंदिरे पाडल्यावर नवीन मंदिरे सरकार बनवून देणार आहे का ?
- देशात महामार्ग किंवा सामान्य मार्ग यांच्यामध्ये येणार्या मशिदी पाडण्याचे धाडस सरकार दाखवते का ?
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील साधूसंत भाजपवर अप्रसन्न आहेत. ते येथील प्रस्तावित ‘विश्वनाथ महामार्गा’चा विरोध करत आहेत. या मार्गासाठी येथील लहान २० मंदिरे पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे साधूसंत आंदोलनही करणार आहेत. (साधूसंतांना आंदोलन करण्यास भाग पाडणे, हे शासनाला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या महामार्गाच्या अनुषंगाने वाराणसी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
१. साधूसंतांचे म्हणणे आहे की, मोदी सरकार या पौराणिक शहराचा वारसा आणि पूर्वापारची सुंदरता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या नेतृत्वामध्ये अनेक साधूंनी यापूर्वीच धरणे आंदोलन केले आहे.
२. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे म्हणणे आहे की, एकीकडे मोदी सरकार अयोध्येमध्ये राममंदिर बनवू इच्छिते आणि दुसरीकडे ते येथील २० हून अधिक लहान मंदिरे पाडण्याची योजना बनवत आहे.
३. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पुढे म्हटले की, लवकरच भाजप सरकारच्या विरोधात शहरामध्ये मोठे आंदोलन करण्यात येईल. जर आमच्या मंदिरांना पाडण्यात आले किंवा त्यांचे स्वरूप पालटले, तर व्यापक स्तरावर विरोध केला जाईल.
४. शहरातील मंदिरे आणि वारसास्थाने वाचवण्यासाठी ‘वारसा वाचवा समिती’ (धरोहर बचाओ समिती)ची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरे वाचवण्याच्या आंदोलनामध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती सहभागी होणार आहेत. त्यांनीच त्यांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना नियुक्त केले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे शंकराचार्यांचे उत्तराधिकारी आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात