श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना प्रवेश देण्याविषयीचे प्रकरण
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर : श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची भूमिका घोषित केली आहे. धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी मंदिर प्रशासनाने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे, अशा आशयाची पाठिंबा दर्शवणारी निवेदने विविध हिंदुत्ववादी संघटनांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्री. सत्यप्रत शुक्ल आणि सौ. ललिता शिंदे यांना भेटून दिली.
ही निवेदने छत्रपती युवा संघटना, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटना, अखिल भारतीय विदर्भ मातंग सेना, सारा फाउंडेशन, भाजप महिला दक्षता समिती आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, भूमाता ब्रिगेडकडून करण्यात येणारे आंदोलन हे स्वप्रसिद्धीची हाव असणारे आहे. त्या महिलांकडून करण्यात आलेली मागणी ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य आहे. वेळप्रसंगी आम्ही धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी आंदोलनही करू.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानच्या भूमिकेला त्रिंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा पाठिंबा
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर : श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भूमाता ब्रिगेडची महिलांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश मिळावा, ही मागणी धुडकावली, त्याविषयी मंदिर प्रशासनाचे अभिनंदन. त्याचसमवेत धर्मपरंपरा चालू ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असून त्याला आमचे समर्थन आहे, असे पाठिंबा दर्शवणारे पत्र त्रिंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या विश्वस्तांना दिले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे. मंदिराच्या गर्भगृहात केवळ सोवळे नेसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेचा अनेक राजे, महंत, उद्योगपती आणि समाजातील सर्वच स्तरांतील महिलांनी आदर केला आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचे समाजातील अनेक महिला आणि ग्रामस्थ यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तरी या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो.
धार्मिक प्रथा जपण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि ग्रामसभा यांचा एकमताने ठराव !
त्र्यंबकेश्वर देवस्थानची धार्मिक प्रथा जपण्यासाठी आणि भूमाता ब्रिगेडला रोखण्यासाठी स्थानिक १९ नगरसेवक एकत्र आले असून त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा एकमताने ठराव संमत करण्यात केला आहे. तसेच आज सरपंच आणि अन्य ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन ग्रामसभेचा एकमताने ठराव संमत करण्याचे ठरवले आहे.