विरोधकांच्या चेतावणीमुळे नगर येथील सभेला कडेकोट बंदोबस्त !
नगर : रायगडावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन सिद्ध करण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या संरक्षणासाठी धारकरी सध्यातरी हातात काठ्याच घेऊन जातील; मात्र वेळ पडली, तर त्यांना भविष्यात हाती तलवारी घ्याव्या लागतील. २ सहस्र धारकर्यांची तुकडी कार्यरत असेल. ते प्रतिदिन गडावर पहारा देतील. सिंहासनाच्या रक्षणासाठी खरेतर या धारकर्यांच्या हाती तलवारी असायला हव्या होत्या; मात्र त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा गळा काढला जाईल, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. येथील टिळक रोड येथे १० जूनला आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. विरोधकांच्या चेतावणीमुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पडली. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी सिद्ध करण्याची घोषणा केली.
या सभेत पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. छत्रपती शिवाजी महाराजांनी २८९ लढाया केल्या. एवढ्या वेळा त्यांनी मृत्यूचा सामना केला.
२. छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ ज्योतिर्लिंगांचे रक्षण केले. त्यामुळे महाराजांची समाधी हे ज्योतिर्लिंग आहे. राष्ट्र म्हणून जगण्यासाठी हाच मार्ग आहे.
३. आपण केवळ राममंदिराचा वाद करत बसलो; मात्र मशिदींच्या भूमीवर मंदिरेच होती.
४. महाराजांच्या सिंहासनासाठी पैशाचा प्रश्न नाही. तो आम्ही उभा करू; मात्र ‘टूरिस्ट आणि पर्यटनासाठी’ रायगड नाही.
५. अनेकांनी शिवचरित्र, कादंबरी, काव्य पोवाडे केले; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अलौकिक आहे. सध्या अनेकांचे ते पोट भरण्याचे साधन झाले आहे.
सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त !
भारिप बहुजन महासंघ, आर्पीआय यांसह इतर काही संघटनांनी पू. भिडेगुरुजी यांच्या सभेवर ‘एल्गार मोर्चा’ नेण्याची चेतावणी दिली होती. प्रत्यक्षातही १० जून या दिवशी ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात आल्यावर पोलिसांनी मोर्चेकर्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभेच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
‘पू. भिडेगुरुजी यांना नगर जिल्ह्यात येण्यास बंदी करावी, तसेच त्यांच्या सभेला अनुमती देऊ नये’, या मागणीसाठी ७ जूनला भारिप बहुजन महासंघाकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच आर्पीआय यांसह इतर काही संघटनांचा या सभेला विरोध होता. पोलीस बंदोबस्तामध्ये ४ पोलीस उपअधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, १६ साहाय्यक पोलीस निरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि ६ आर्सीपीच्या तुकड्या यांचा समावेश होता.
‘अहमदनगर’ नव्हे, तर ‘अंबिकानगर’ करा !
पू. भिडेगुरुजी यांनी ‘‘अहमदनगर’चा उल्लेख ‘अंबिकानगर’ करा’, असे आवाहन केले. त्यांनी नगर शहराच्या नामांतराचा प्रस्ताव या सभेत मांडला.
सरकार आणि झेंडे यांना सध्या इस्लामिक पाचर मारली आहे ! – पू. भिडेगुरुजी
हिंदुत्वावर मते मागून केंद्रात आणि राज्यात सरकार स्थापन झाले असले, तरी त्यांच्या झेंड्यामध्ये इस्लामिक पाचर (विहन) असलेला रंग आहे. त्यामुळे त्यांच्या साहाय्यावर आम्ही थुंकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानेच धर्मांधांचा नंगानाच थांबला अन्यथा महाराष्ट्रातील जनतेवरही अत्याचार झाले असते. धर्मांधांनी देशातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त केली. महाराष्ट्रातील मंदिरे वाचली आहेत ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. हिंदु समाजात परस्परवाद हे धोकादायक आहे. महाराजांना हिंदूंचे राज्य हवे होते. हिंदु समाजाने कसे जगले पाहिजे, हे महाराजांनी शिकवले. महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात