हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेच्या द्वितीय दिवसाचा वृत्तांत
रामनाथी (गोवा) : हिंदू समाज हा एक योद्धा समाज होता, आहे आणि राहील. वर्ष १८७८ मध्ये इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा करून भारतियांना शस्त्रविहीन केले. शस्त्र बाळगणे, हा अपराध ठरवला. या कायद्यानंतर ज्यांनी अहिंसेचे व्रत धारण केले, त्या मोहनदास गांधी यांनी ‘इंग्रजांनी शस्त्रास्त्र कायदा केल्याने मी त्यांना कदापिही क्षमा करणार नाही’, असे म्हटले होते. भारतात प्राचीन काळापासून भारताकडे सैन्यदल होते. त्या वेळीही अनेकांनी स्वतःचे शौर्यजागर करून ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हे सन्मानाचे पदक मिळवले होते. यातूनच भारतीय समाज हा योद्धा समाज होता, हेच आपल्याला दिसून येईल. शौर्यजागरण करण्यासाठी वीररसयुक्त गीतांचे गायन करा, शाळांमधून सैनिकी शिक्षण देणे बंधनकारक करण्याची मागणी करा. आपल्याला जेव्हा देहावर नाही, तर मनामध्ये केशरी माळा घालण्याची इच्छा होईल; तेव्हा हिंदूंचा विजय सुनिश्चित असेल, असे क्षात्रतेजयुक्त प्रतिपादन वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदू विद्या केंद्राच्या माजी निर्देशक प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले. हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेत १० जून या दिवशी ‘भारताच्या शौर्याचा इतिहास आणि शौर्यजागरणाची आवश्यकता’ या विषयावर त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,
१. हिंदूंच्या देवता शस्त्र-अस्त्र धारी आहेत. अन्य कुठल्याही पंथांच्या श्रद्धास्थानांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र नाहीत. ख्रिश्चनांचा येशू तर क्रूसावर लटकला आहे.
२. रामायण-महाभारत ही युद्धप्रशंसक महाकाव्ये आहेत. रामायण, रामचरितमानस या ग्रंथांमध्ये तर युद्धवर्णनाला ‘सुंदरकांड’ असे नाव दिले आहे. हिंदु धर्मात चारही वर्णांच्या लोकांनी युद्ध केले आहे.
३. येथील ऋषी-मुनीही अस्त्रधारी होते. रामायण काळात प्रभु श्रीरामांना ऋषी-मुनींनी दिव्य अस्त्रे दिल्याचा उल्लेख आहे.
४. कुंभपर्वामध्येही संन्यासी योद्ध्या नागा साधूंना शाही स्नानाचा अधिकार आहे.
५. प्राचीन काळी २० टक्के पुरुषांच्या उपजीविकेचे साधन शस्त्र हे होते. म्हणजे २० टक्के लोक सैन्य, पोलीस, गुप्तचर विभाग यांमध्ये कार्यरत होते. त्या हिशोबाने आज ५ ते ६ कोटी लोक सुरक्षासेवेत असायला हवेत. त्यांची संख्या आज केवळ काही लाख आहे.
‘शौर्याच्या परंपरेत महिलांचे स्थान न्यून नाही. सनातन संस्थेमध्ये तर वृद्ध महिलाही हिंदु राष्ट्रासाठी गहू निवडण्याची सेवा करतात’, असे गौरवोद्गार प्रा. केडिया यांनी काढले.