Menu Close

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नाशिक येथील सभेला हिंदुद्वेष्ट्यांकडून विरोध !

नाशिक – हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु धर्म, संस्कृती आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारला अन् गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या देवतेचे कर्तृत्व समाज विसरत चालला आहे. शासनकर्ते आणि समाज यांनाही शिवरायांविषयीचा मान-सन्मान, आदर-अभिमान यांचा विसर पडला आहे. शिवरायांच्या भूमीतील पिढी उच्चशिक्षण, अमाप पैशाच्या आमिषापोटी विदेशी भूमीत जाऊन चाकरी करते, अशी खंत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केली. नाशिक येथील कारंजा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत १० जून या दिवशी ते बोलत होते.

रायगड किल्ल्यावरील ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना आणि खडापहारा तुकडी निर्मितीच्या प्रसारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणेच या वेळी सभास्थळाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, त्यामुळे त्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

हिंदुद्वेषी संघटनांच्या कार्यकर्त्यांची समाजविघातक कृत्ये आणि धमक्या !

स्वतःच्या हिंदुद्वेषी मागण्यांसाठी जनतेला वेठीस धरणारे समाजद्रोहीच होत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

काही संघटनांनी ‘पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्यात यावी’, या मागणीसाठी आंदोलन केले. या वेळी बसवर दगडफेक करण्यात आली आणि एका बसवर जळत्या पेट्रोलची बाटली फेकण्यात आली. या वेळी दोन युवकांनी एका इमारतीवर चढून ‘पू. भिडेगुरुजी यांना अटक न केल्यास उडी मारू’, अशी धमकी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते खाली आले. या वेळी आंदोलकांनी पू. भिडेगुरुजी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांकडून पू. भिडेगुरुजींच्या संदर्भात उतावळेपणाने आक्षेपार्ह वृत्त आणि सत्यता !

‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८० हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल’, असा दावा पू. भिडेगुरुजी यांनी नाशिक येथील कार्यक्रमात केल्याचे धादांत खोटे वृत्त देऊन प्रसिद्धीमाध्यमे त्यांच्यावर टीका करत आहेत. वाहिन्यांवरही एवढ्याच वाक्यांची ध्वनीफीत दाखवण्यात येत आहे.

सध्या प्रसारमाध्यमांतून जी ध्वनीफीत प्रसारित होत आहे, त्यापुढे पू. गुरुजींची वाक्ये पुढीलप्रमाणे आहेत

‘‘हे जे त्या आंब्यात सामर्थ्य आहे. तेच सामर्थ्य शिवाजी आणि संभाजी या पितापुत्रांच्या जीवनात आहे. शिवाजी-संभाजी हा महामृत्यूंजय मंत्र ! हा संजीवनी मंत्र ! हा महाअमृत मंत्र प्रत्येकाच्या मनावर ठसवणे, बिंबवणे, एकरूप करणे, म्हणजेच हिंदूंच्या रक्तात राष्ट्रीयत्व निर्माण करणे होय !’’

मात्र प्रसारमाध्यमे ही वाक्ये न दाखवता अर्धवट संभाषण दाखवून त्यातून गैरअर्थ काढत आहेत.

संपूर्ण विधान न ऐकवता जाणीवपूर्वक हवा तो भाग ऐकवणार्‍यांच्या विरोधात प्रसंगी आम्हीही न्यायालयात जाऊ ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेल्या मार्गदर्शनातील जाणीवपूर्वक अर्धवट भाग दाखवून, ऐकवून प्रसिद्धीमाध्यमे पू. गुरुजींची अपकीर्ती करत आहेत. अखंड देशभक्ती असलेला समाज उत्पन्न करणार्‍या एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाविषयी असे करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. जर प्रसिद्धीमाध्यमे कोणतेही भान न ठेवता हवा तेवढाच भाग दाखवून खोटे आरोप करत असतील, तर प्रसंगी आम्हीही न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी दिली आहे.

अंधश्रद्धा पू. भिडेगुरुजी पसरवत आहेत कि माध्यमे ? – पराशर मोने, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. पराशर मोने यांची पुढील प्रतिक्रिया वाचल्यावर माध्यमांनी सत्याचा कसा अपलाप केला आहे, हे लक्षात येईल !

सांगली जिल्ह्यातील पू. गुरुजींच्या परिचयातील एक शेतकरी एकदा गुरुजींकडे आला आणि ‘त्याच्या शेतातील आंब्याचे फळ खाल्ले असता ज्यांना मूलबाळ होत नाही, अशा अनेक स्त्रियांना अपत्यप्राप्ती होते’, असे त्याने सांगितले. ही गोष्ट खरी कि खोटी हे गुरुजींनाही माहिती नाही, ना गुरुजींनी त्याची शहानिशा केली; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या देशाचे नाते काय आहे, हे समजावून सांगताना गुरुजींनी ही गोष्ट संदर्भ अथवा उदाहरण म्हणून सांगितली.

‘जसे ते कथित आंब्याचे फळ खाल्ल्याने वांझ स्त्रीला गर्भधारणा होते (त्या शेतकर्‍याच्या दाव्यानुसार) तसेच ‘शिवाजी महाराज’ आणि ‘संभाजी महाराज’ या राष्ट्रोद्धारक मंत्रांच्या प्रभावामुळे देशाची काहीही जाणीव नसलेल्या, राष्ट्रीयदृष्ट्या नपुंसक किंवा वांझ असलेल्या समाजात राष्ट्रभक्ती उत्पन्न होते, हा गुरुजींच्या वक्तव्याचा मुख्य आशय होता. त्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वत्व, स्वाभिमान गमावलेल्या हिंदु समाजासाठी प्रेरणादायी आणि राष्ट्रोद्धारक मंत्रच आहेत, हे गुरुजींच्या भाषणाचे मुख्य सूत्र होते. ते मुख्य सूत्र बाजूला ठेऊन वानगीदाखल दिलेल्या उदाहरणावरून समाजात संभ्रम निर्माण करणारी प्रसारमाध्यमे खरोखर स्वतःची भूमिका नैतिकतेने पार पाडत आहेत का ?, हाच खरा प्रश्‍न आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी नेमके काय बोलले आणि त्याचा काय विपर्यास केला गेला ते खालीलप्रमाणे !

आपल्या भाषणात पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘विदर्भात असतांना मी माझ्या एका मित्राच्या शेतात गेलो होतो. त्याने आंब्याची १०८ झाडे लावली होती. त्यांचे विशेष गुण सांगतांना तो मला म्हणाला की, याचे आंबे जो कोणी खाईल, मग स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यातील नपुंसकत्वाचे गुण नष्ट होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल.’’ या संदर्भात पुढे पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘माझ्याकडेही असेच शेत आहे, त्यातले आंबे जो खाईल त्याच्यातील धर्मभक्ती राष्ट्रभक्ती याविषयी असणारे नपुंसकत्व जाऊन त्यालाही पुत्रप्राप्ती होईल.’’

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे शेत म्हणजे श्रीशिवप्रभुप्रेरणेचे काम अर्थात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान ! त्यातली आंब्याची झाडे म्हणजे श्रीशिवछत्रपती आणि श्री संभाजी महाराज यांचे जीवनदर्शन समजून घेऊन आयुष्य जगण्याची पद्धती. आंबे म्हणजे त्यातून निर्माण होणारी शिवाजी-संभाजी रक्तगटाची पिढी. ती निर्माण झाली की, त्यामुळे समाजातील धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यांच्याविषयी असणारे नपुंसकत्व नष्ट होईल !

वास्तविक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे सांगलीत ‘दहा बाय दहा फुटा’च्या एका धारकरी बंधूने दिलेल्या खोलीत रहातात. जिथे वापराचे कपडे आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारी पुस्तके सोडली, तर बाकी काहीही सापडणे अशक्य आहे. त्यात शेत आणि बाग कुठून येणार ?

– श्री. योगेश देशपांडे, धारकरी, सांगली.

(म्हणे) ‘पू. भिडेगुरुजींनी महिलावर्गाचा अपमान केला आहे !’ – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

कोणतीही सत्य स्थिती जाणून न घेता, ‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ यानुसार सुप्रिया सुळे यांनी केलेले अज्ञानमूलक वक्तव्य !

एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होतांना आपल्याला दिसत आहे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे ‘आंबा खाल्ला, तर अपत्यप्राप्ती होते’, असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. महिलांचा हा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (ही हिंदुद्वेषापोटी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून केलेली टीकाच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘संभाजी भिडेगुरुजींच्या विरोधात कारवाई करा !’

हिंदुद्वेषी अंनिसची नेहमीची गरळओक !

‘माझ्या शेतातील आंबा खाल्ला, तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’, असे वक्तव्य करून अंधश्रद्धा पसरवणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात कारवाई करावी. त्यांच्या समर्थकांनी ते आपल्याला कोणत्या युगात नेत आहेत, हे पहावे, असे अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी म्हटले आहे. (हिंदुद्वेषाची झापडे लावलेल्या बुद्धीवादी अंनिसने कितीही विवेक आणि बुद्धी जागृत ठेवली, तरी पू. भिडेगुरुजींच्या भाषणातील मतितार्थ तिला काय कळणार ? त्यासाठी राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम असावे लागते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *