- संतांना गृहस्थाश्रम किंवा अन्य कोणत्याही आश्रमांमध्ये बांधता येणार नाही; कारण ते त्यांच्या प्रारब्धानुसार गृहस्थ किंवा अन्य आश्रमानुसार आचरण करत असतात. गृहस्थाश्रमातील व्यक्ती साधना करून संतपद प्राप्त करू शकते आणि हिंदूंच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये असे अनेक संत आणि गुरु आहेत, तसेच प्राचीन काळातील ऋषी हेही विवाहित होते !
- हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना साधना करण्याचे शिकवून त्यांच्यात खर्या संतांना ओळखण्याची पात्रता निर्माण करायला हवी !
इंदूर – भय्यूजी महाराज यांच्या निधनाचे आम्हाला दु:ख आहे. ते एक सन्माननीय व्यक्ती होते; मात्र आमचे स्पष्ट धोरण आहे की, धर्म आणि अध्यात्म क्षेत्रांमध्ये विवाहितांना ‘संत’ म्हटले जाऊ नये. आम्ही गृहस्थाश्रमींना संत म्हणून मान्यता देत नाही. आम्ही अशा गोष्टींचा अनेकदा विरोध केला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी केले आहे. ते प.पू. भय्यूजी महाराजांविषयी बोलत होते. त्यांनी ‘भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराने वाद घालू नये अन्यथा महाराजांच्या सहस्रो अनुयायींच्या श्रद्धेला धक्का बसेल’, असेही महंत नरेंद्र गिरी म्हणाले.
महंत नरेंद्र गिरी यांनी मांडलेली सूत्रे
१. धर्म आणि अध्यात्म क्षेत्रांमध्ये कार्य करणार्यांनी हे ठरवले पाहिजे की, त्यांना संतत्व हवे कि संसार हवा ? त्यांनी दोन्ही नौकांवर स्वार होऊ नये. त्यामुळे स्वाभाविक ते कौटुंबिक ताणतणावामुळे ग्रस्त रहातील.
२. ५० वर्षांपूर्वी या क्षेत्रामध्ये गृहस्थाश्रमी संतांना महत्त्व दिले जात नव्हते; मात्र आता परिस्थिती एकदम पालटली आहे. आता प्रसारमाध्यमे आणि जनता कथावाचक, उपदेशक आणि प्रवचनकार यांना संत म्हणत आहेत. प्रत्येकाला ‘संत’ शब्दाचा उपयोग करणे आमच्या मते योग्य नाही; कारण हिंदूंची श्रद्धा भगव्या वस्त्राशी जोडलेली आहे. त्यामुळे सध्या कथावाचकही भगवे वस्त्र घालून स्वतःला संत घोषित करतात.
३. समाजानेच हे निवडायला हवे की, त्यांना कोणाला त्यांचे मार्गदर्शक मानायचे आहे. जे लोक संतत्व आणि गृहस्थाश्रम या दोन्हींचा एकत्र आनंद घेत असले, तरी ते शेवटी अधोगतीला जातील. (ज्या गृहस्थाश्रमींना त्यांच्या गुरूंनी संत घोषित केले आहे आणि त्यांची गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नंतरही साधना चालू आहे, ते कधीही अधोगतीला जाणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात