नवी दिल्ली : अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच मृत्यूपत्र समोर आले आहे. या मृत्युपत्रानुसार लादेनची २.९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अमेरिकन सैन्याच्या विशेष अभियानात २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये लादेनला ठार मारण्यात आले होते. अमेरिकन मीडियाने जाहीर केलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे. माझ्या इच्छांचे पालन करा. अल्लासाठी हा पैसा जिहादवर खर्च करा असे लादेनने मृत्यूपत्रातून कुटुंबीयांना सांगितले आहे. आपला मृत्यू झाल्यास पत्नी आणि मुलांचा सांभाळ करावा, असे लादेनने दुसऱ्या एका पत्रात वडिलांना उद्देशून लिहिले आहे.
या पत्रातून लादेनला आपल्या हत्येचा धोका वाटत असल्याचे स्पष्टपणे समजते. मला मारुन टाकल्यास माझ्यासाठी दुआ करा, माझ्या नावे खूप दानधर्म करा असे लादेन म्हणतो. आपली संपत्ती सुदानमध्ये असल्याचा उल्लेख लादेनने केला आहे. मात्र ती रोख रकमेच्या स्वरुपात आहे की अन्य रुपात, याबाबत कुठलेही स्पष्ट संकेत नाहीत. यातील काही भाग त्याच्या वारसांना मिळाला आहे का, याचीही माहिती नाही. ९० च्या दशकात लादेन पाच वर्ष सुदानमध्ये राहिला होता. लादेनच्या पश्चात अल जवाहिरी हा अल कायदाचा म्होरक्या झाला आहे. लादेन जीवंत असताना जवाहिरी दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जात होता.
संदर्भ : दैनिक प्रभात