हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांची आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
रामनाथी (गोवा) : हिंदु जनजागृती समितीचे कार्य राष्ट्रव्यापी होत असतांना विविध राज्यांमध्ये समितीच्या विविध संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतांना अनेकांनी आध्यात्मिक उन्नतीही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली साधना करून आध्यात्मिक उन्नतीही केली आणि हिंदवी स्वराज्यही स्थापन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक समितीसेवकांची उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे आणि हेच ध्येय ठेवून पुढे वाटचाल करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथे समितीने आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय साधना आणि कार्यवृद्धी शिबिरा’च्या उद्घाटनसत्रात ते मार्गदर्शन करत होते. शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. या वेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. या प्रसंगी सनातन संस्था आणि समिती यांच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.
या शिबिरामध्ये समितीचे नवीन उपक्रम, समितीसेवकांची साधनावृद्धी आणि समितीच्या धर्मकार्याची वृद्धी यांसह विविध विषयांवर प्रायोगिक आणि गटचर्चा स्वरूपात शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.