माउंटआबू (राजस्थान) : संस्कृती वाचली, तर हिंदु वाचेल; हिंदु वाचला, तर जग वाचेल; कारण आपली भारतीय संस्कृती वसुधैव कुटुम्बकम् । आहे. यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी आणि तोच विश्व कल्याणाचा एकमात्र उपाय आहे, असे प्रतिपादन बिकानेर (राजस्थान) येथील श्री लालेश्वर महादेव मंदिराचे महंत स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांनी येथे केले. ते येथील सोमनाथ महादेव मंदिरात आयोजित हिंदुस्थानमध्ये हिंदू असंघटित का आहे ? या विषयावर विविध हिंदु संघटनांच्या पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज पुढे म्हणाले, आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी सातत्याने आक्रमणे झाली, तरीही आपल्यातील धगधगीमुळे ती टिकून राहिली. तरुणांनी स्वतःतील शक्ती ओळखायला हवी. त्यांनी त्यांचे पौरुषत्व परिष्कृत करायला हवे. त्यासाठी त्यांनी शास्त्र आणि शस्त्र शिकायला हवे. सध्या आपापसांत लढण्याची आणि एक दुसर्याचा द्वेष करायची वेळ नाही, तर असंघटित हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना संघटित करण्याची वेळ आहे. त्यांना एका झेंड्याखाली आणून सनातन संस्कृती वाचवण्यासाठी नियोजनबद्धरित्या कार्य करण्याची वेळ आहे; कारण हिंदुत्वाला खंडीत करण्याचा प्रयत्न चालू आहे. धर्माला राष्ट्र आणि अध्यात्म यांपासून वेगळे करण्यात आले आहे. राज्यघटनेत पालट करण्यात येऊन अल्पसंख्यांकांचे विष त्यात पेरण्यात आले आहे. गुरुकुल परंपरा नष्ट केल्यामुळे शिक्षणाचे पतन झाले आहे. यामुळे युवा पिढी सनातन संस्कृतीपासून दूर जात आहे. आपले जीवन यंत्रवत झाले आहे. या मनोवृत्तीतून हिंदु संघटनांनी बाहेर पडून संघटित झाले पाहिजे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला ओळखले पाहिजे, तरच आपण स्वतः सुरक्षित राहू शकतो आणि संस्कृती वाचवू शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात