या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंचे प्रश्न सोडवण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी करण्यात येईल, अशी अपेक्षा !
कर्णावती (गुजरात) : डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी २४ जून या दिवशी येथे एका कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ या हिंदु संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. डॉ. तोगाडिया या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत. या वेळी त्यांनी ‘हिंदू ही आगे’ हे संघटनेचे ब्रीद असणार असल्याचे सांगितले. ही संघटना नवीन असली, तरी तोच आक्रमकपणा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. तोगाडिया २६ जून या दिवशी अयोध्येमध्ये जाऊन रामललाचे दर्शन घेणार आहेत आणि नंतर तेथे भाजपच्या विरोधात सभा घेणार आहेत.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापनेच्या वेळीच राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय किसान परिषद, राष्ट्रीय मजदूर परिषद (४० पेक्षा अधिक वय असणार्यांसाठी), ओजस्विनी (तरुणींसाठी) आणि राष्ट्रीय छात्र परिषद या संघटनांचीही स्थापना केल्याची घोषणाही करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद हिंदूंचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिकार यांसाठी काम करणार आहे. तसेच पूर्वीपासून चालू असणारे हिंदू हेल्पलाईन, ‘इंडिया हेल्थलाईन’, एक मुठ्ठी अनाज, हिंदू अॅडव्होकेट्स फोरम आणि ‘यूथ सोशिओ-इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरम’ आदींचे कार्यही चालू रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात