एखाद्या सरकारी शाळेतील मुख्याध्यापक असा निर्णय परस्पर कसा घेऊ शकतात ? सरकारचे याकडे लक्ष नाही का ?
पलक्कड (केरळ) : कपाळावर कुंकवाचा टिळा किंवा हातावर कोणताही गंडा-दोरा असेल अथवा कोणतीही धार्मिक प्रतीके वापरल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होईल. त्यांना अनुत्तीर्ण करण्यात येईल, अशी नियमावली येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी बनवली आहे. या नियमावलीनंतर पहिली आणि दुसरी इयत्तेच्या मुलांच्या पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केले. ‘सरकारी शाळेचा आणि आमच्या धार्मिक श्रद्धेचा आपसांत काय संबंध ? शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतलेला हा निर्णय तुघलकी आहे’, अशी टीका पालकांनी केली. प्रसारमाध्यमांनी मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी अनुमती नाकारली.
पालकांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेने आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार आम्ही आमचा धर्म आणि आमच्या श्रद्धा कशा व्यक्त करायच्या, याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे. आम्हाला त्याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिकवू नये. सामाजिक कार्यकर्ते राहुल ईश्वर म्हणाले की, मुख्याध्यापक शाळेत स्वतःचे नियम आणून मनमानी करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात