गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाईची ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ची मागणी
बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू असुरक्षित !
ढाका : बांगलादेशच्या जेसूर जिल्ह्यातील कोटवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसेपरा गावामध्ये चंदन कुमार घोष नावाच्या हिंदु सरकारी कर्मचार्याची महंमद हसिबूर रेहमान आणि त्याचे इतर ३ धर्मांध साथीदार यांनी नुकतीच हत्या केली. या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने केली आहे.
१. चंदन कुमार घोष हे लेखापरीक्षक (ऑडिटर) म्हणून ढाका येथे सरकारी सेवेत होते. ते ढाका येथून बसेपरा गावामध्ये २० जून या दिवशी त्यांच्या घरी सायकल रिक्शातून जात असतांना महंमद हसिबूर रेहमान आणि त्याचे इतर ३ मुसलमान साथीदार यांनी भर रस्त्यात सुर्यांनी भोसकून त्यांची हत्या केली, तसेच त्यांनी त्यांचे पाकीट आणि भ्रमणभाष संच पळवला.
२. या हत्या प्रकरणी महंमद हसिबूर रेहमान याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला जेसूर न्यायदंडाधिकार्यापुढे उभे केले असता त्याने गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. या हत्या प्रकरणात त्याचे इतर ३ साथीदारही सहभागी आहेत, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.
२. या हत्येची माहिती मिळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कोटवाली पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच तातडीने अन्वेषण करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.
३. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी मृत चंदन कुमार घोष यांच्या घरी भेट दिली. दु:खी कुटुंबाला हानीभरपाई देण्यात यावी. तसेच मृत व्यक्तीच्या पत्नी आणि मुले यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात