- भारतात अनेक जण विविध गुन्ह्यांत अटकेत असतांना काही जण शिक्षा भोगत आहेत; मात्र संयुक्त राष्ट्राला केवळ नक्षलवाद्यांचाच पुळका का आला आहे ? साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारखे अनेक निष्पाप हिंदुत्वनिष्ठ अटकेत होेते, त्या वेळी संयुक्त राष्ट्रांना असा पुळका का आला नाही ?
- ‘भारतात अधिकाधिक काळ अराजक रहावे’, अशी परराष्ट्रांची इच्छा आहे का ? भारतातील आतंकवादी, नक्षलवादी, तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, अंधश्रद्धाविरोधी संघटना यांना विदेशातून याचसाठी पैसा दिला जातो आणि ते भारतात अशांती निर्माण करतात !
नवी देहली : नुकतेच संयुक्त राष्ट्राने ‘काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होते’, असा कांगावा केला होता. आता संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे मानवाधिकाराचे समर्थक डॉ. जी.एन्. साईबाबा, जे व्हील चेअरविना (चाकाच्या खुर्चीविना) चालू शकत नाहीत, त्यांची सुटका करावी’, असे म्हटले आहे. डॉ. साईबाबा देहली विश्वविद्यालयाचे प्राध्यापक होते. त्यांना वर्ष २०१४ मध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्यामुळे अटक केल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
संयुक्त राष्ट्राने भारत सरकारलाही पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. साईबाबा यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ते विविध १५ आजारांनी ग्रस्त असून त्यातील काही आजार गंभीर आहेत. कारागृहाची वाईट स्थिती, अप्रशिक्षित कर्मचारी आणि कैद्यांची असणारी अधिक संख्या यांमुळे डॉ. साईबाबा यांची स्थिती अजून ढासळू शकते. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. डॉ. साईबाबा यांना देशद्रोहाखाली शिक्षा ठोठावण्यात आली; मात्र त्यांच्याकडून हिंसाचाराचा कट रचण्यात आला, हे सिद्ध करण्यास सरकार अयशस्वी ठरले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात