पंतप्रधान मोदी यांच्याकडून आक्रमणाचा निषेध
इस्लामी देशांत अल्पसंख्यांक असलेल्या हिंदु आणि शीख यांच्या स्थितीविषयी भारतातील पुरोगामी आणि निधर्मीवादी पक्ष काहीच बोलत नाहीत !
काबूल : अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत. या भागात हिंदु आणि शीख नागरिक मोठ्या प्रमाणावर रहातात. या आक्रमणाचे दायित्व ‘इस्लामिक स्टेट’ने घेतले आहे; मात्र एका वृत्तसंस्थेने यामागे तालिबानचा हात असून त्याला आयएस्आयने साहाय्य केल्याचे म्हटले आहे. आक्रमण होण्याच्या काही घंट्यांंपूर्वीच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी याच भागात एका रुग्णालयाचा शिलान्यास केला होता. त्यांना भेटण्यासाठीच हे शीख आणि हिंदू राजभवनावर जात असतांना हे आक्रमण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ट्वीट’ करून या आक्रमणाचा निषेध करतांना ‘अफगाणिस्तानच्या दुःखद घटनेत भारत त्याचे साहाय्य करण्यास सिद्ध आहे’, असे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही या आक्रमणाचा निषेध केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना त्या भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील हिंदु आणि शीख आयएस्आयचे लक्ष्य
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएस्आयच्या आदेशावरून इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानच्या पाकलगतच्या सीमेवरील हिंदु आणि शीख यांना लक्ष्य करत आहे. वर्ष १९९० च्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदु आणि शीख यांची लोकसंख्या ८० सहस्रांहून अधिक होती; मात्र आता ती केवळ १ सहस्र इतकीच राहिली आहे. त्यातही जे पाकच्या सीमेलगतच्या भागात रहात आहेत, त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. गेल्या मासात पाकच्या खैबर पख्तूनवा प्रांतातील पेशावरमधील शीख धर्मगुरु चरणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. १ जुलैच्या आक्रमणात ठार झालेले अवतार सिंह खालसा हे ऑक्टोबर मासात होणार्या निवडणुकीत उभे रहाणार होते. अफगाणिस्तानच्या संसदेत हिंदु आणि शीख यांना एक जागा आरक्षित असते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात