तृणमूल काँग्रेसने हत्या केल्याचा भाजपचा आरोप
- स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करू न शकणारा भाजप देशातील नागरिकांचे रक्षण करील का ?
- तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये हत्या केल्या जात आहेत, तर भाजपचे केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लावत नाही ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक मरू का देत आहेत ?
मुर्शिदाबाद (बंगाल) : येथे भाजपचे ५४ वर्षीय कार्यकर्ते धर्मराज हजरा यांचा हात आणि पाय बांधलेल्या स्थितीतील मृतदेह येथील शक्तीपुरा गावातील एका तलावात सापडला. यापूर्वी गेल्या मासात पुरूलिया जिल्ह्यात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला होता. आताही भाजपचे जिल्हाध्यक्ष गौरी शंकर घोष यांनी आरोप केला आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार करत आहे. हजरा यांना पंचायत निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून धमक्या मिळत होत्या. त्याच लोकांनी हजरा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तलावात फेकून दिला आहे.
१. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘ट्वीट’ करून म्हटले की, तृणमूलने आणखी एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल हिंसेचे केंद्र बनले आहे.
२. शक्तीपूर येथील तृणमूलचे आमदार रबीउल आलम चौधरी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आमच्या पक्षाचा या घटनेशी काहीही संबंध नाही’, असे ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात