नाटके आणि चित्रपट यांतून होणारे संत अन् महापुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती
नंदुरबार : येथे ३० जून या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. यात महिलांच्या लैंगिक शोषणास कारणीभूत असणार्या अश्लील संकेतस्थळांवर बंदी आणावी, तसेच नाटके, चित्रपट, विज्ञापने, चित्रे यांद्वारे देव-देवता, संत आणि महापुरुष यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागण्या करण्यात आल्या. नेताजी सुभाष बाबू चौकात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनप्रसंगी अश्लील संकेतस्थळांविषयी सौ. पुष्पाताई थोरात, देवतांचे विडंबन यांविषयी श्री. आशिष जैन यांनी, तर दोन्ही विषयांवर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे गोसेवा प्रमुख आनंद मराठे, भारतीय जनता पार्टी वाहतूक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र राजपूत, राणा राजपूत सेवा समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिका गिरनार, प्रवीण थोरात, हिंदुत्वनिष्ठ दिलीप ढाकणे पाटील, समाजसेविका रीना जाधव आदी हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.