न्हावाशेवा : उरण पोलिसांनी परदेशात निर्यात केले जाणारे तब्बल २८ हजार किलो (२८ टन) गोमांस जेएनपीटी जवळील भेंडखळ गावाजवळील युएलए या गोदामातून जप्त केले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार या बाबत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या मालाची बाजारभावानुसार ४५ लाख ५६ हजार ३१६ रूपये एवढी किंमत आहे. हा माल निर्यात करणारे आरोपी हे तामिळनाडू जिल्ह्यातील असून ते फरार आहेत.
पकडण्यात आलेले मांस हे गायीचे असून ते नागालॅण्ड येथील दिमापुरहून निर्यात करण्यात आले आहे. हिंदुस्थानमध्ये गाईच्या कत्तलीस व मांस विक्रीस बंदी असल्यामुळे या आरोपीने हे मांस म्हशीचे असल्याचे दाखवले. तसेच डोन्ना (DONNA) ब्रॅण्ड पॅकिंगमध्ये भरून एका कंटेनर मध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे मांस कतार मध्ये निर्यात केले होते. त्यानंतर हे मांस कतार मधुन परत दुसऱ्या कंटेनरमध्ये सीलबंद करून जेएनपीटी मार्गे हिंदुस्थानमध्ये पाठवले होते. उरण तालुक्यातील भेंडखळ गावाजवळील युएलए या गोदामात हा कंटेनर ठेवण्यात आला होता. या कंटेनर बाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी हा कंटेनर उघडून त्यामधील मांस कलिना येथे तपासणीसाठी पाठविले असता ते म्हशीचे मांस नसून गायीचे असल्याचे सिद्ध झाले.
उरण पोलिसांनी गोमासांचा कंटेनर जप्त केला असून सध्या हा कंटेनर युएलए गोदामात सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
संदर्भ : सामना