मुसलमानबहुल देशांत हिंदूंची स्थिती काय असते, हे यावरून लक्षात येते ! हिंदु राष्ट्रात अल्पसंख्यांकांचे काय होणार ?, असा प्रश्न विचारणारे इस्लामी देशांत हिंदूंची काय स्थिती आहे, याविषयी कधीच बोलत नाहीत !
ढाका : बांगलादेशमधील १५ हून अधिक हिंदु संघटनांनी नवरात्रीतील दुर्गापूजेच्या कालावधीत ३ दिवसांच्या शासकीय सुट्टीची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रीय समितीने ‘राष्ट्रीय प्रेस क्लब’समोर नुकतीच एक मानवी साखळी आयोजित केली होती. त्यात वरील मागणी करण्यात आली. बांगलादेशात ईद-उल-फितर आणि ईद-उल-अझा या इस्लामी सणांना प्रत्येकी ४ दिवस (एकूण ८ दिवस) सार्वजनिक सुट्टी असतांना, तेथील हिंदूंना दुर्गापूजेसाठी केवळ एक दिवस सुट्टी मिळते. बांगलादेशातील हिंदूंना देशाच्या फाळणीपूर्वी दुर्गापूजा उत्सवाच्या वेळी पूर्ण आठवडाभर सुटीचा आनंद मिळत होता.
१. या आंदोलनाच्या वेळी ‘हिंदू मोहजोत’चे अध्यक्ष प्रोव्हसचंद्र रॉय म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून आम्ही ३ दिवसांची शासकीय सुट्टी मागत आहोत; परंतु प्रशासन शांत राहिले आहे. ही मागणी पुढील १५ दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही देशभरात आंदोलन करू.’’
२. ‘हिंदूंच्या जिवाचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणीही आम्ही शासनाकडे केली आहे; कारण धार्मिक तणाव देशभरात पसरत आहे’, असे प्रोव्हसचंद्र रॉय यांनी सांगितले.
३. ‘सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आदर्श हिंदु मंदिर उभारले पाहिजे’, अशी मागणीही रॉय यांनी केली.
४. या वेळी ‘बंगाल राष्ट्रीय हिंदू महाजोत’चे कार्यकारी सरचिटणीस पलाश कांती डे, बांगलादेश हिंदु परिषदेचे अध्यक्ष दीपंकर सिकदर दीपू, सरचिटणीस स्वजन मिश्रा, राष्ट्रीय हिंदु समाज संस्कार समिती अध्यक्ष प्रा. नरेंद्रनाथ बिस्वास आणि सरदांझोली मंचचे अध्यक्ष रतनचंद्र पाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात