भाग्यनगर : लवकरच प्रसारित होणार्या संकेतस्थळावरील (वेब सीरीज) ‘भ्राममानुला अम्माई नवाबुल अब्बाई’ (ब्राह्मण मुलगी आणि नवाबाचा मुलगा) या लघुचित्रपटाद्वारे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याकारणाने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. वृत्तपत्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी श्री. विशाल कुमार यांनी ही तक्रार नोंदवली आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कृतीशील होणार्या श्री. विशाल कुमार यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या चित्रपटात एक मुसलमान मुलगा आणि एक हिंदु ब्राह्मण मुलगी यांच्यातील प्रेमसंबंधांचे चित्रण करण्यात आले आहे.
१. विशाल कुमार म्हणाले की, मी फेसबूकवर या लघुचित्रपटाचा ट्रेलर पाहिला. या लघुपटाने जाणूनबुजून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले आहे. फारूक रॉय यांनी दिग्दर्शित आणि पेद्द फरीद, चिन्ना फरीद आणि अजगर अली शेख यांनी निर्माण केलेला हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. त्यामुळे आम्ही या लघुपटाच्या निर्मात्यांविरोधात आवश्यक कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी करतो.
२. ‘तेलंगण ब्राह्मण सेवा समख्या’ या संघटनेचे सदस्य म्हणाले, ‘‘लघुपट ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करत आहे आणि त्याचे शीर्षक आक्षेपार्ह आहे. आम्ही निर्मात्यांना हा चित्रपट सामाजिक माध्यमे, यूट्यूब यांवरून काढण्याची आणि प्रसारण न करण्याची मागणी करतो. आम्ही पोलीस महासंचालक एम्. महेंद्र रेड्डी यांना योग्य कारवाईसाठी निवेदन सादर केले आहे.’’
३. सामाजिक माध्यमांद्वारे होणार्या टीकेला घाबरून आणि पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक फारूक रॉय आता या चित्रपटाचे शीर्षक ‘‘वल्ला अम्माई विल्ला अब्बाई’ (येथील मुलगी आणि ‘गार्डन हाऊस’मधील मुलगा) असे पालटत आहेत’, असे सांगितले जात आहे. (केवळ नाव पालटल्याने कथा पालटली जाणार नाही, त्यामुळे अशा चित्रपटांवर बंदीच हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)