हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांकडून पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याचा पुन्हा विपर्यास !
पुणे : संतांनी अध्यात्मावर भाष्य केले, तर मनूने त्याही पुढे जाऊन अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला, असे मार्गदर्शन पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘भक्ती-शक्ती संगम’ या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजेच ७ जुलै या दिवशी केले. पू. भिडेगुरुजी यांनी असे मार्गदर्शन केलेले असतांनाही हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांनी ‘संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होता’, असे वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाचा विपर्यास केला. हे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे सांगत काही आघाडीची म्हणवणारी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी पू. भिडेगुरुजी यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. (पुरोगामित्वाच्या नावाखाली एकीकडे मनुस्मृती, संतपरंपरा मानायची नाही आणि दुसरीकडे त्यांविषयी जाणकारांनी काही भाष्य केले, तर त्याची नकारात्मक बातमी करायची, हा दुटप्पीपणा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पू. भिडेगुरुजी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा वस्तूनिष्ठ भाग
या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पुणे येथील कार्यकर्ते श्री. पराशर मोने यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी वस्तूस्थिती विशद केली. ते म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी आत्मोन्नतीचा मार्ग सांगितला होता. संतांनी अध्यात्मावर भाष्य केले, तर मनूने त्याच्याही पुढे जाऊन अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला. भक्तीला शक्तीची म्हणजेच अध्यात्माला सामर्थ्याची जोड असणे आवश्यक आहे, असा पू. भिडेगुरुजींच्या वक्तव्याचा आशय होता. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी मनुस्मृतीतील काही श्लोकही उद्धृत केले.
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी अन्य प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये समान आहेत; पण मनुष्याकडे धर्म नावाची गोष्ट आहे, जी अन्य प्राण्यांकडे नाही, असे पू. भिडेगुरुजी यांनी सांगितले होते.’’ (प्रसिद्धीमाध्यमांनी ‘वडाचे साल पिंपळाला’ लावण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो कायमचा यशस्वी होऊ शकत नाही. पू. भिडेगुरुजी अथवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांकडून विपर्यस्त वार्तांकन करण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले, तरी सत्य चिरंतन टिकणारे असल्याने ते समोर येतेच, हे उथळ वार्तांकन करणार्यांनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात