‘हिंदूंच्या मंदिराच्या संदर्भात योग्य निर्णय हिंदूंचे शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत हेच घेऊ शकतात, अन्य कुणीही त्यात नाक खुपसू नये’, असे हिंदूंनी अन् त्यांच्या संघटनांनी सर्वांना सांगायला हवे !
भुवनेश्वर (ओडिशा) : सनातन धर्माची अनेक युगांची परंपरा आहे. त्याचे उल्लंघन करून श्री जगन्नाथ मंदिरात सर्वांना प्रवेश देणे आम्हाला स्वीकार्य नाही, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. गोवर्धन पीठाचे शंकराचार्य हे श्री जगन्नाथ मंदिरातील पंडितांची मुख्य संस्था ‘मुक्ती मंडपा’चे प्रमुख असतात. शंकराचार्यांबरोबरच गजपती राजा दिव्यसिंह देव यांनीही अन्य धर्मियांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. राजा दिव्यसिंह देव हे भगवान जगन्नाथाचे पहिले सेवक मानले जातात. १२ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ‘या मंदिरात सर्वांना प्रवेश देण्याविषयी मंदिर प्रशासनाने विचार करावा’, असे मत मांडले होते. त्यावर शंकराचार्य आणि राजा दिव्यसिंह देव यांनी त्यांचा विरोध दर्शवला आहे. विश्व हिंदु परिषदेनेही याला विरोध केला आहे.
१. गजपती राजा दिव्यसिंह देव यांनी म्हटले की, प्रतिवर्षी रथयात्रेच्या माध्यमातून भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना मंदिरातून बाहेर आणले जाते. यातून सर्व धर्मियांना त्यांचे दर्शन घेता येऊ शकते, तसेच ते ‘स्नान उत्सव’ही पाहू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे मत हे अंतरिम आदेशाप्रमाणे आहे. याविषयी मंदिर व्यवस्थापन समिती रथयात्रेनंतर यावर चर्चा करून निर्णय घेईल.
२. विहिंपचे ओडिशा राज्याचे कार्यवाहक अध्यक्ष बद्रीनाथ पटनायक यांनी म्हटले की, मंदिराविषयी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि गजपती राजा देव्यसिंह देव यांच्याशी चर्चा केली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात