पुणे : आर्य चाणक्य यांनी अर्थनीती, उद्योग, शासन, सुरक्षाव्यवस्था यांविषयीचे लिखाण प्राचीन ग्रंथ, धर्मशास्त्र यांच्या आधारे केले. आर्य चाणक्यांच्या सिद्धांतांचा आधार अध्यात्म असल्याने आजही त्यांचे शाश्वत आणि उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ‘आर्य चाणक्य – जीवन आणि कार्य : आजचे संदर्भ’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे, पालकमंत्री गिरीश बापट, संयोजक योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
आर्य चाणक्यांविषयी अमित शहा यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. देशावर परकीय आक्रमणे होत असतांना राज्यव्यवस्थेच्या संदर्भात मूलभूत सिद्धांत मांडणे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राष्ट्राची उभारणी करणे, हे चाणक्यांचे खरे वैशिष्ट्य आहे. जेव्हा सर्व व्यवस्था खिळखिळ्या झाल्या होत्या, संस्कृती, भाषा यांचा र्हास होऊ लागला होता, तेव्हा भारत राज्यांचा समूह नाही, तर एक राष्ट्र असल्याची धारणा आर्य चाणक्य यांनी विकसित केली. चाणक्यांनी देह ठेवला, तेव्हा अफगाणिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत आणि ब्रह्मदेशापासून गुजरातपर्यंत एक सक्षम राष्ट्र म्हणून भारत उदयाला आला होता. भारत तेव्हा सर्वाधिक सैनिक असलेला देश होता.
२. ‘राजा नाही, तर राष्ट्र महान आहे’, हे प्रथम चाणक्यांनी सांगितले. राजा आणि राज्य या संकल्पना त्या काळात एका दैवी परंपरेशी जोडल्या गेल्या होत्या. ‘राजा हा जनतेचा सेवक आहे’, ही कल्पना चाणक्य यांनी रुजवली.
३. विश्वातील सर्व देश एकमेकांशी लढाया, करार करून जन्माला आले. एका अर्थाने सर्व देश हे भू-राजकीय देश आहे; मात्र भारत हा एकमेव भू-सांस्कृतिक देश आहे.
‘चाणक्यांचे सिद्धांत, कौटिल्याचे अर्थशास्त्र पाठ्यक्रमात असायला हवेत’, असे मत प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठता नाही, तर योग्यता हा निकष ! – अमित शहा
‘जो ज्येष्ठ असेल, तो राजा बनेल, असे नाही, तर जो श्रेष्ठ असेल, तो राजा बनेल. एखाद्या राजाला एकच मुलगा असेल; पण तो राज्य चालवण्यास योग्य नसेल, तर अशा प्रसंगी राजपुरोहिताने राजाची निवड करावी’, अशी संकल्पना आर्य चाणक्य यांनी मांडली. घराणेशाही नाही, तर क्षमतेवर आधारित नेतृत्व चाणक्यांना अपेक्षित होते, असे सांगत अमित शहा यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात