कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील नागेश्वर मंदिराला राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा सर्वोकृष्ट ‘आर्किस्ट्रक्चरल डिझाईन’चा पुरस्कार मिळाला आहे. नवी देहली येथे झालेल्या सोहळ्यात नागेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी हा पुरस्कार स्वीकारला. नागदेववाडीसारख्या छोट्या गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या मंदिराला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळतो, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. उमाकांत राणिंगा यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. उमाकांत राणिंगा म्हणाले,
१. देहलीत ‘स्मार्ट सिटीज इंडिया पुरस्कार २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आर्किस्ट्रक्चरल डिझाईन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वीकारतांना मंदिराचे रचनाकार आणि ‘आर्ट एन स्पेस स्टुडिओ’चे संचालक श्री. संतोष रामाणे, शिल्पकार श्री. बाजीराव गवळी, श्री नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अजित तांबेकर, सचिव श्री. दिनकर गायकर, सर्वश्री बी.के. जाधव, डी.डी. कुंभार, गौतम जाधव, सानिया रामाणे उपस्थित होते.
२. अष्टकोनी असलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे शिखर नागाच्या वेटोळ्यांनी सिद्ध करण्यात आले असून मंदिरातील प्रकाश व्यवस्था त्या शिखरातूनच करण्यात आली आहे. ३० एप्रिल २०१७ या दिवशी हे मंदिर पूर्णत्वास आले.
३. मंदिर परिसरात आमदार श्री. चंद्रदीप नरके यांच्या निधीतून सुशोभिकरणाची कामे करण्यात आली आहेत.
नागेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये
१. मंदिर १०० टक्के काळ्या दगडात उभारण्यात आले आहे. नागाच्या नऊ शिल्पांकन असणारे हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे.
२. मंदिराची रचना अष्टकोनी आकारात बांधण्यात आली आहे.
३. नागदेवतेची नऊ कुळे असून अष्टकोनी आकारात आठ कुळे आणि मंदिरावर नववे कुळ आहे.
४. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मस्तकावर धारण केलेल्या नागदेवतेचे स्वतंत्र नागेश्वर मंदिर आहे.
५. या मंदिरात प्रतिदिन किरणोत्सव होतो, नव्हे तर मूर्तीवर किरणांचा वर्षाव होतो; कारण या मंदिराच्या शिखराच्या मध्यभागी स्फटीकाची अभ्यासपूर्वक रचना केली आहे. त्यामुळे सूर्याच्या किरणांचा मध्यान्हीच्या काळात नागदेवतेच्या मूर्तीवर वर्षाव सतत होतो.
या मंदिरात दैवी प्रकाश (डिव्हाईन लाईट) पडतो. नागदेवतेच्या मंदिरात शिखराच्या मध्यभागी स्फटिकाची रचना केली आहे. सूर्याची किरणे त्या स्फटिकावर थेट पडतात. ही किरणे मंदिरात प्रवेश करत असताना स्फटिकाचे तापमान वाढते. या किरणांमधील उष्णता काही अंशी स्फटिकांमध्ये शोषून घेतली जाते. नैसर्गिक सूर्याच्या किरणांचा तमोगुण काही अंशी स्फटिकामध्ये शोषून घेतला जातो. शिखराच्या अंतर्गत रचनेतून स्फटिकामुळे वक्रीभूत झालेली किरणे समोरासमोर असलेल्या पृष्ठभागावर परावर्तित होत मंदिरात येतात. ग्रीन हाऊसमधून वनस्पतींना सूर्याच्या किरणांचा शोषगाळप (फिल्टरेशन) मुळे लाभ होतो. त्याचप्रमाणे स्फटिक नसतांना मंदिरात येणारी किरणे आणि स्फटिकाची रचना केल्यानंतर येणारी किरणे यांच्या गुणधर्मांतील पालट हे जाणवण्याएवढे असतात. मंदिरात त्यांचा अनुभव घेता येतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात