वकिली व्यवसाय करतांना दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन काम करायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद
कल्याण : वकिली व्यवसाय करतांना ‘आरोपी दोषी आहे’, असे समजल्यानंतरही दोषीचा अधिवक्ता आहे; म्हणून ‘त्याला वाचवणे आपले कर्तव्य आहे’, असे म्हणत आपण त्याची बाजू घेतो आणि त्याला सोडवतो. त्यामुळे त्याने केलेल्या पापकर्मांच्या फळात आपणही भागीदार होतो. आपण आपली बौद्धिक क्षमता वापरून गुन्हेगाराला सोडवतो; मात्र त्यानंतरही गुन्हेगार गुुन्हे करतच रहातो, ही गंभीर गोष्ट असून अशा वृत्तीला थांबवणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. वकिली व्यवसाय करतांना आपण दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन मार्गक्रमण करायला हवे, असे उद्गार अधिवक्ता विवेक भावे यांनी कल्याणमध्ये आयोजित अधमहवक्त्यांच्या बैठकीत काढले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त अधिवक्त्यांची बैठक ८ जुलै या दिवशी येथे घेण्यात आली.
या वेळी अधिवक्ता किरण जोशी, अशोक अवस्थी, प्रदीप ताडमारे, सौ. किशोरी कुलकर्णी, विवेक भावे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन आणि श्री. सतीश कोचरेकर आदी उपस्थित होते.
अधिवक्ता भावे पुढे म्हणाले, ‘‘आपण जर अधर्माशी जोडले गेलो, तर कर्म, फळ आणि न्याय यांप्रमाणे शिक्षा मिळणारच ! त्यामुळे आपण संघटित होऊन साधना करत सत्च्या बाजूने उभे रहाण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यात सहभागी व्हा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात