नवीन पनवेल येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
पनवेल – स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्या महाराष्ट्र शासनाने शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारला. देवनिधी लुटणार्या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्या शासनाला श्री शनैश्वर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शासनाने श्री शनैश्वर देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे. शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्यांवर अद्याप कारवाई का केली नाही, त्या भ्रष्टाचार्यांना मोकाट का सोडले आहे, याची उत्तरे द्यावीत; अन्यथा शासनावर श्री शनिदेवाचाच नाही, तर हिंदूंचाही कोप होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. या श्री शनैश्वर देवस्थानच्या सरकारीकरणाच्या विरोधात करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टीपू सुलतानचे नाव ‘हज हाऊस’ला देऊन त्याचे उदात्तीकरण करणारा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करण्याची मागणी !
क्रूरकर्मा टीपू सुलतानचे नाव ‘हज हाऊस’ला देण्याचा निर्णय कर्नाटकमधील जेडीएस् आणि काँग्रेसी शासनाने घेतला आहे. टीपूचा इतिहास हा हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा इस्लामी शासक असा आहे. हंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा, सर्व मुसलमानेतरांना (हिंदूंना) मुसलमान बनवण्याची शपथ घेणारा, मंदिरांत गोहत्या करणारा, मंदिरे उद्ध्वस्त करून देवतांच्या मूर्तींचे भंजन करणारा असा टीपू सुलतानचा क्रौर्यशाली इतिहास पहाता क्रूरकर्मा टीपू सुलतानचे नाव ‘हज हाऊस’ला देणे म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळल्यासारखे होईल. त्यामुळे कर्नाटक शासनाने ‘हज हाऊस’ला टीपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
टिपूचे नाव देणार्या राज्यकर्त्यांना पालटा ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी सेना, कोकण प्रांताध्यक्ष
पूर्वी असुर मंदिरांवर आक्रमण करायचे आताचे राज्यकार्तेरूपी असुर मंदिरांचे सरकारीकरण करून हिंदु धर्म संपवू पहात आहेत. कर्नाटकमध्ये हज हाऊसला टिपू सुलतानाचे नाव देण्याचे दुष्कर्म हिंदुद्रोही शासनाने केले आहे. नुसते टिपू सुलतानाचे नाव पालटून आता थांबायचे नाही, तर ज्या राजकर्त्यांनी टिपू सुलतानाचे नाव दिले त्यांनाच पालटावे लागणार आहे.
मंदिरांच्या नावावर निवडून आलेल्या सरकार मंदिराचे सरकारीकरण करते ! – अमिता चौहान, संस्थापक, नारीशक्ती जागृती फाऊंडेशन
मंदिराच्या नावावर सरकार निवडणुका लढवते आणि निवडून आल्यावर मंदिरांचे सरकारीकरण केले जाते हा अन्याय आहे. हिंदूंनी दर्शनासाठी कोठे जावे, असे सरकारला वाटते. सरकारने एकतरी मशीद किंवा चर्च कह्यात घेण्याचे धैर्य दाखवले आहे का ? कर्नाटक सरकारने हज हाऊसला टिपू सुलतानाचे नाव दिले म्हणजे सरकारला टिपू सुलतान निर्माण करायचे आहेत का ? हिंदू कमकुवत नाहीत. हे आघात संघटित होऊन हाणून पडायला हवेत.
शनैश्वर मंदिराचे सरकारीकरण आम्ही होऊ देणार नाही ! – श्री अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन
टिपू सुलतान, औरंगजेब, बाबर या इस्लामी आक्रमकांनी हिंदु धर्माची मोठ्या प्रमाणावर हानी केली. त्यांचा उदो उदो हिंदुद्रोही काँग्रेस शासन करत आहे. आमच्या देवतांनी अनेक असुरांचा वध केला आहे. न्यायालयही दुराचारी व्यक्तीला फाशी देते. हिंदु धर्म केव्हा वाचेल, जेव्हा हिंदूंची मंदिरे वाचतील. यासाठी सरकारने सरकारीकरण केलेली मंदिरे त्वरित हिंदूंच्या कह्यात द्यावीत. शनैश्वर मंदिराचे सरकारीकरण आम्ही कदापी होऊ देणार नाही.
स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री सामाजिक संस्था आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. मुसळधार पाऊस असूनही या वेळी २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.
२. आंदोलन पाहून दोन हिंदूंनी कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
३. या आंदोलनाचा विषय फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ६० सहस्र लोकांपर्यंत याची पोस्ट पोहोचली (रिच), ६ सहस्र ८०० धर्माप्रमींनी याचा व्हिडिओ पाहिला आणि ४०२ जणांनी याचा व्हिडिओ पाठवलेला.