नवी देहली : मुसलमान महिलांच्या संदर्भातील ‘खतना’ या प्रथेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
१. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देतांना म्हटले की, अनेक देशांत ही प्रथा बंद करण्यात आली आहे. भारतातही या प्रथेवर बंदी घातली पाहिजे. ही प्रथा असुरक्षित आहे.
२. मुसलमानांमधील दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंंच्या म्हणण्यानुसार, इस्लाम धर्मातील ही महत्त्वाची प्रथा असून पुरुषांप्रमाणे महिलांचीही खतना केली जाते.
३. ‘विनाकारण शारिरीक हिंसा का केली जाते ? एका प्रथेनुसार महिलांच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याची अनुमतीच कशी दिली जाते ?’, असे प्रश्न न्यायालयाने या वेळी उपस्थित केले.
खतना म्हणजे काय ?
बोहरा मुसलमान समाजात ६ ते ८ वयामध्ये मुलींची खतना केली जाते. या प्रक्रियेत योनीच्या बाहेरची त्वचा काढली जाते. वेदना शमवण्यासाठी खतनानंतर हळद, गरम पाणी आणि मलम लावले जाते. ‘खतना केल्यानंतर महिलांच्या लैंगिक इच्छेवर नियंत्रण मिळवता येते’, असा समज या प्रथेमागे आहे. तसेच या प्रथेमुळे लग्नापूर्वी महिला कुणाशीही शारीरीक संबंध ठेवू शकत नाही, असेही मानण्यात येते; परंतु खतना प्रथेच्या वेळी मुलीला होणार्या वेदना प्रचंड असतात. दाऊदी बोहरा समाजाच्या अनेक महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रथेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. भारतीय दंड संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत त्याला गुन्हा ठरवले जावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. डिसेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एका महासभेत जगभरात या प्रथेला संपुष्टात आणण्याचा संकल्प केला गेला. या संदर्भात संयुक्त राष्ट्राने ६ फेब्रुवारीला ‘जागतिक खतना विरोधी दिना’ची घोषणा केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात