मिरज : थायलंडमध्ये थाम लुआंग या अतिदुर्गम आणि १० किलोमीटर लांब असलेल्या एका गुहेत १२ खेळाडू आणि त्यांचे फूटबॉलचे प्रशिक्षक २३ जूनपासून अडकून पडले होते. तेथे अतीप्रचंड पाऊस झाल्याने पाणी वाढून पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गुहेत पाणी साठल्याने खेळाडूंना बाहेर काढणे अशक्य झाले होते. त्या संदर्भात साहाय्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल्)चे ‘फ्लड पंप’ पाठवण्यास सांगितले. भारत सरकारने तातडीने हालचाली करून त्यांचे डिझाईनप्रमुख श्री. प्रसाद कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांना थायलंडला पाठवले. श्री. प्रसाद कुलकर्णी हे प्रतिकूल परिस्थितीत पंपाचे काम कसे करायचे, मूलभूत सोयी नसतांना पंप वापरायचे असतील, तर काय करायला हवे या विषयातील तज्ञ आहेत.
थायलंडला पोहोचताच श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या चमूने लगोलग कामाला प्रारंभ केला आणि फ्लड पंप चालू केले. पाणीउपसा झाल्यामुळे रविवारी रात्री चार खेळाडूंची, तर सोमवारी आणखी पाच जणांची सुटका करण्यात आली. भारतासाठी असलेली ही गौरवास्पद कामगिरी श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसाद कुलकर्णी हे दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक !
श्री. प्रसाद कुलकर्णी यांचे घर सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमासमोर आहे. ते दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक असून ते प्रखर हिंदु धर्माभिमानी आहेत. श्री. प्रसाद कुलकर्णी हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आहेत, तसेच ते ‘भारत स्वाभिमान’चे सदस्यही आहेत.
श्री. कुलकर्णी हे सनातन संस्थेच्या साधिका वैद्या सौ. सुजाता मधुसूदन कुलकर्णी (रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या साधिका) यांचे चुलतबंधू आहेत.
गुहेत अडकलेल्यांना ध्यानधारणेचा लाभ ! – प्रसाद कुलकर्णी
या संदर्भात श्री. प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ‘‘थाम लुआंग गुहेत बारा खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक दोन आठवडे अडकून पडूनही पडूनही ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम रहाण्यात ध्यानधारणेचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अनुभवाविषयी आम्ही त्यांना विचारले असता ‘ध्यानधारणेमुळे मनोधैर्य वाढले आणि अडचणींचा सामना करण्याची शक्ती मिळाली’, असे त्यांनी सांगितले. ध्यानधारणा हे भारताचे वैशिष्ट्य असल्याने त्यांच्या या कृतीविषयी आम्हाला अभिमान वाटला.’’ (भारतातील अध्यात्माची परंपरा आणि भारतातील बुद्धीमान नागरिक यांचे विश्वाला कसे साहाय्य होत आहे, याचेच हे उदाहरण आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात