राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांसह अन्य संतांविषयी काढलेल्या अवमानकारक उद्गारांचे प्रकरण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ‘संत तुकाराम महाराजांचा खून करण्यात आला’, असे निषेधार्ह वक्तव्य केल्यानंतर वारकर्यांमध्ये संतापाची लाट आली आणि त्यांनी ‘जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर क्षमा मागावी किंवा पुरावे सादर करावेत’, असे घोषित केले, तसेच त्यांचा तीव्र निषेध केला. या संदर्भातील संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. चैतन्य महाराज देहूकर आणि ह.भ.प. राणा महाराज वासकर यांच्या प्रतिक्रियाही दैनिक सनातन प्रभातमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या.
सर्व माध्यमांतून वारकर्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आव्हाड यांनी नाइलाजाने का होईना ‘जर वारकर्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो’, असे एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला सांगितले. ‘आ.ह. साळुंखे यांच्यासारख्या अनेक जणांनी तुकाराम महाराजांवर झालेले हल्ले आणि त्याचा इतिहास लिहिला आहे, तोच मी सांगत आहे. हे सत्य बोलून दाखवणे हा गुन्हा असेल, तर तो मी केला आहे’, असेही सांगायला या वेळी आव्हाड विसरले नाहीत. (‘पडलो तरी नाक वर !’ ही म्हण सार्थ करणारे आव्हाड ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सर्वत्र टीका होऊ लागल्याने आव्हाड यांनी त्यांचे वक्तव्यही ‘फेसबूक’वरून हटवले आहे.
आव्हाड यांचे हसे !
प्रसिद्धीचा हव्यास असणारे आव्हाड शाळांमध्ये भगवद्गीता वाटण्याच्या सूत्रावरून शासनावर टीका करू लागले आणि वार्ताहरांना ‘मलाही गीता पाठ आहे’, असे म्हणाले. त्या वेळी एका वार्ताहराने त्यांना २ मिनिटे गीता म्हणून दाखवायला सांगितल्यावर ‘यदा यदाही…’ हा श्लोक म्हणतांना ते चुकले आणि ‘यदा यदासी..’ असा चुकीचाउच्चार त्यांनी केला आणि पुढचे काही त्यांना म्हणताच आले नाही. त्यानंतर ‘आपल्याला भगवद्गीता येतेच’, असा हट्ट धरत त्यांनी ‘फेसबूक’वरून परत श्लोक म्हणणे चालू केले आणि ते परत चुकले. त्यामुळे अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली ! त्यामुळे परत ही पोस्टही त्यांनी हटवली. भा.ज. यु.मो.चे उपाध्यक्ष राम सातपुते यांनी आव्हाड यांना भगवद्गीता भेट दिली
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात