पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच होत नसेल, तर भाजप राममंदिराविषयी किती गंभीर आहे, हेच लक्षात येते !
नवी देहली : प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘राममंदिर उभारणीचे काम वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रारंभ होईल’, या वृत्तानुसार कुठलीही घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेली नाही. भाग्यनगरमध्ये झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत राममंदिराचा विषय कार्यसूचीमध्येही (अजेंड्यामध्ये) नव्हता, असे स्पष्टीकरण भाजपने ‘ट्वीट’ करत दिले आहे.
प्रसारमाध्यमांनी याआधी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी. शेखर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या बैठकीमध्ये अमित शहा यांनी ‘सध्या न्यायालयीन घटनाक्रम पहाता राममंदिराच्या बांधकामास लोकसभा निवडणुकीपूर्वीच प्रारंभ होईल’, असे विधान केल्याचे म्हटले होते. (याचा अर्थ एकतर पी. शेखर खोटे बोलत आहेत किंवा भाजप खोटे बोलत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राममंदिर न उभारल्यास भाजप रसातळाला जाईल ! – डॉ. रामविलास दास वेदांती
भाजपचे माजी खासदार आणि राममंदिर जन्मभूमी न्यासाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती यांनी दोन दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच एका कार्यक्रमात टीका करतांना म्हटले होते की, राममंदिराच्या नावावरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घरोघरी जाऊन मते मागितली होती. आता राममंदिर न उभारल्यास भाजप रसातळाला जाईल. (भाजपने दिलेले स्पष्टीकरण पहाता डॉ. रामविलास दास वेदांती म्हणतात, तसे झाल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात