Menu Close

वास्को येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

वास्को : महाराष्ट्रात आजपर्यंत सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार, अनियमितता आणि अधर्माचरण यांना प्रोत्साहन मिळत असल्याने शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने रहित करावा आणि कर्नाटक येथील ‘हज भवन’ला हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानचे नाव देऊन त्याचे उदात्तीकरण करणारा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा, अशा मागण्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली येथे १४ जुलैला केल्या. येथील मुरगाव नगरपालिकेसमोर शनिवार, १४ जुलै या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत हिंदूंनी निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.

शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला.

१. नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने स्वतःच्या निवडणूक घोषणापत्रात ‘हिंदूंची सरकारीकरण केलेली मंदिरे हिंदूंना परत करणार’, अशी एक प्रमुख घोषणा केली होती. महाराष्ट्रात मात्र हेच भाजप सरकार हिंदूंकडे असलेली मंदिरे काढून घेऊन त्यांचे सरकारीकरण करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निधर्मी सरकारला हिंदूंची मंदिरे चालवण्याचा अधिकार नसून केवळ तेथील व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून ते मंदिर पुन्हा त्या त्या समाजाकडे परत देण्यास सांगितले आहे. असे असतांनाही भाजप सरकारने शिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. महराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील गंभीर घोटाळ्यांची स्थिती पहाता, त्याचा न्यायनिवाडा न करता नव्याने आणखी एका मंदिराचे सरकारीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेणे, हे अत्यंत अयोग्य आणि निषेधार्ह आहे.

२. दक्षिण भारतात ८ सहस्रांंपेक्षाही जास्त देवळे नष्ट करणारा, गोहत्या करणारा आणि मंदिरांची तोडफोड करणार्‍या टिपू सुलतानच्या नावाची इतिहासात ‘क्रूरकर्मा’ म्हणून नोंद आहे. टिपूचा इतिहास हा ‘हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा इस्लामी शासक’, असा आहे.  टिपू सुलतानचा हा क्रूर इतिहास पहाता, त्याचे नाव ‘हज भवन’ला देऊन काँग्रेस शासन मुसलमानांना चुचकारू पहात आहे काय ? असा प्रश्‍न निर्माण होतोे. आंदोलनाच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.

आंदोलनामध्ये सहभागी संघटना

भारत स्वाभिभान, भारतीय कामगार सेना, शिव योद्धा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा

आंदोलनाला संबोधित केलेल्या वक्त्यांची नावे

श्री. मारुति शिरगावकर, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना; श्री. लक्ष्मण मांजरेकर, भारत स्वाभिमान; सौ. शुभा सावंत, सनातन संस्था आणि श्री. माधव विर्डीकर, शिव योद्धा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *