मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रयत्न, हे मोठे राष्ट्र आणि धर्म कार्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी
पुणे : हिंदु मंदिरांच्या सरकारीकरणाच्या धोरणाच्या विरुद्ध पावले उचलण्याचा प्रयत्न अत्यंत योग्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. सरकारची पावले त्या विरोधात दिसतात; म्हणून अशा प्रकारचे काही होऊ नये; म्हणून घटनात्मक सर्व प्रयत्न करणे आणि जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. आपण ते करत आहात. हे एक मोठे धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य आहे. त्याविषयी सर्वांचे अभिनंदन. या कार्याला सुयश मिळो आणि सरकार योग्य तीच पावले उचलो, ही आशा आहे, अशी प्रतिक्रिया प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांनी व्यक्त केली.
‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने १४ जुलैला सायंकाळी विविध मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, पदाधिकारी यांनी प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांची भेट घेऊन चर्चा केली. या संदर्भातील निवेदनही त्यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांना मंदिरांच्या सरकारीकरणाचे सरकारचे प्रयत्न, मंदिरांची आतापर्यंत झालेली दुर्दशा, मोडीत काढल्या गेलेल्या प्रथा-परंपरा यांविषयी अवगत केले.