कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणात मी सभागृहात लक्षवेधी मांडल्यावर त्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी चालू आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे. त्यामुळे मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच राज्य सरकारने कह्यात घेतलेली सर्वच मंदिरे मुक्त करावीत आणि भक्तांच्या कह्यात द्यावीत’, या मागणीसाठी नुकतेच त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार श्री. क्षीरसागर यांना मंदिर सरकारीकरणाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित केलेला ‘मंदिर संस्कृती वाचवा’ हा विशेषांक भेट देण्यात आला. ‘विशेषांक आणि निवेदन यांचा सविस्तर अभ्यास करतो’, असे आमदार श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, तसेच सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.