महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात साधकांनी केला ॥ श्रीजयंत बाळाजी आठवले – जय गुरुदेव ॥ हा जयघोष !
रामनाथी (गोवा) : माघ कृष्ण पक्ष द्वादशी, म्हणजे ६ मार्च २०१६ या दिवसापासून हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाला आहे, असे महर्षींनी घोषित केले. महर्षींच्याच आज्ञेने या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ॥ श्रीजयंत बाळाजी आठवले – जय गुरुदेव ॥ हा जयघोष भावपूर्ण करण्यात आला. या वेळी जयघोष करण्यामागील पार्श्वभूमी सांगून महर्षींनी सांगितलेली आनंदवार्ता सर्वांना सांगण्यात आली आणि हा छोटासा भावसोहळा साधकांच्या मनमंदिरात कायमचा कोरला गेला. उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून हा जयघोष आश्रमातील सर्व विभागांना ऐकवण्यात आला, तसेच संगणकीय प्रणालीद्वारे अन्यत्रच्या साधकांनाही ऐकवण्यात आला
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बौद्धिक स्तरावर जयघोषाचे जाणवलेले अर्थ
१. आतापर्यंत माझ्या नावाच्या आधी डॉ. हे अक्षर लिहिलेले असे. तो अर्थ एका विशिष्ट ज्ञानाच्या संदर्भातील आहे. याउलट श्रीचा अर्थ सर्वच चांगल्या गोष्टींच्या संदर्भात आहे.
२. अध्यात्मात प्रगती करत असलेल्याच्या नावाआधी पाश्चात्यांचे डॉ. हे अक्षर शोभत नाही.
– श्रीजयंत बाळाजी आठवले ((परात्पर गुरु) डॉ. आठवले) (६.३.२०१६)
रामनाथी आश्रमात ६.३.२०१६ या दिवशी झालेल्या महर्षींनी सांगितलेल्या विधीविषयी माहिती
आज, ६ मार्च २०१६ म्हणजेच सनातनच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस ! हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अहोरात्र धडपडणार्याप.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला आजच्या या शुभदिनापासून आरंभ होणार आहे आणि त्यांच्या महान कार्याला दिवसागणिक अधिकाधिक प्रसिद्धी प्राप्त होणार आहे, अशी शुभवार्ता सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी आपल्या सर्वांना सांगितली आहे.
१. प.पू. डॉक्टरांच्या नावाचा दैवी अर्थ
आजपासून प.पू. डॉक्टरांचे नाव श्रीजयंत बाळाजी आठवले असे असेल.
अ. श्री : श्री म्हणजे लक्ष्मी ! प्रत्येक अवताराचे धर्मकार्य पूर्णत्वास जाण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. प.पू. डॉक्टरांच्या नावापूर्वी श्रीचा उल्लेख केल्याने त्यांना लक्ष्मीदेवीचे साहाय्य लाभेल.
आ. जयंत : जयंत हे नाव रघुवंशातील (रामवंशातील) एका राजाचे होते, म्हणजेच या नावामध्ये रामवंश दडलेला आहे.
इ. बाळाजी : बाळाजी म्हणजे स्वतः तिरुपती बालाजी ! हे नाव कृष्णवंशाशी निगडीत आहे.
ई. आठवले : भगवान शिवाचे एक रूप असलेल्या नटराजाला तमिळ भाषेत आडवले असे म्हटले जाते. नटराजाने केलेल्या नृत्याविष्कारामध्ये ब्रह्मांडातील सर्व हालचाली सामावल्या गेल्या आहेत. त्या नृत्याच्या माध्यमातून त्याने सार्या ब्रह्मांडाचे संचलन केले आहे. अशा प्रकारे सार्या ब्रह्मांडाचे नियमन करणारा नटराज म्हणजे तो आडवले ! (तमिळमध्ये ठ हे अक्षर नाही.)
२. प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष करणे
साधकांनी आतापर्यंत एक तप (१२ वर्षे) भगवंताची उपासना केली आणि त्याचे फळ म्हणून भगवंतानेच आपल्या कार्याचे दायित्व स्वतःवर घेतले. भगवंताचे हे कार्य प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष करून साध्य होईल. आजपासून आरंभ होणार्या प्रसिद्धी कार्याचे जयघोष हे प्रतीक आहे.
आज दुपारी २.३० ते ४.१५ या कालावधीत ॥ श्रीजयंत बाळाजी आठवले – जय गुरुदेव ॥ असा जयघोष सर्वत्र करण्यात येईल. यामुळे निर्माण होणारा नाद सार्या आसमंतात दुमदुमेल आणि प.पू. डॉक्टरांच्या कार्याला शुभारंभ झाल्याचे सर्वज्ञात होईल. – (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलाई, तमिळनाडू. (६.३.२०१६, दु. १२.१५)
श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !
परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले होते. आता त्यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाल्याची घोषणा करून महर्षींनी साधकांना अनमोल भेटच दिली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करून साधकांनी त्यांचा कशा प्रकारे लाभ करून घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या चरणी अनंतकोटी कृतज्ञ आहे !
महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?
अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्टयांवर लिहिलेले असते. त्यातील जीवनाडी सजीव आहे. तिचा श्वासोच्छवास होत आहे. वाचतांना त्यातील अक्षरे आपोआप पालटतात. नाडी वाचतांना साक्षात शिव-पार्वती नाडीवर नर्तन करतात, असे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले आहे. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य असणारे आज विश्वातील पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेच एकमेव आहेत.
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मी अवतार आहेे किंवा माझ्या अवतारी कार्याला आरंभ केला आहे, असे म्हटलेले नाही. महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या साधकांनी हा जयघोष केला. साधकांचा आणि सनातन प्रभातच्या संपादक मंडळाचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही हे वृत्त प्रसिद्ध करत आहोत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात