शिवसेना आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने !
- अशी मागणी सरकारकडे का करावी लागते ?
- सव्वाचार वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीच्या आश्वासनाची पूर्तता न होणे, हे मुख्यमंत्र्यांना लज्जास्पद !
नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) नियुक्त करून ६ मासांत भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनास सव्वाचार वर्षांचा कालावधी उलटून गेला असूनही चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही, तसेच भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे देवस्थान समितीची भूमी आणि दागिने यांवर डल्ला मारणार्यांवर त्वरित कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर १७ जुलै या दिवशी निदर्शने केली. आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
आमदार श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले की,
१. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ३,०६७ मंदिरांचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कक्षात येते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोट्यवधी रुपयांच्या भूमींचा अपहार झाला आहे.
२. याविषयी शासनानेही कोणती हालचाल केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवस्थान समितीतील भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालत आहेत का ?, अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची लवकर पूर्तता करून भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढावीत’, अशी मागणी केली.
निदर्शनाला उपस्थित शिवसेनेचे आमदार
आमदार सर्वश्री राजन साळवी, भरतशेठ गोगावले, प्रकाश अबिटकर, वैभव नाईक, बालाजी किणीकर, शांताराम मोरे, तुकाराम काटे, सदानंद चव्हाण, अमित घोडा
निदर्शनांच्या वेळी दिलेल्या घोषणा
- देवस्थान समितीत भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे !
- मुख्यमंत्र्यांनी केलेली एस्आयटी नेमणुकीची घोषणा हवेतच काय ?
- देवस्थानची भूमी आणि दागिने यांच्या घोटाळ्याचे झाले तरी काय ?
अशाप्रकारच्या घोषणा आमदारांनी देत हातात फलक घेऊन विधानभवनात प्रवेश केला आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात