Menu Close

गरोठ : ‘महाराणा युवा संघा’कडून ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता निर्मिती कार्यशाळे’चे यशस्वी आयोजन

गोव्यातील ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चा परिणाम !

गरोठ (मंदसौर, मध्यप्रदेश) : जून २०१८ मध्ये गोव्यातील ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’मध्ये सहभागी झालेल्या ‘महाराणा युवा संघाच्या कार्यकर्त्यांनी अन्य कार्यकर्त्यांसाठीही अशा प्रकारच्या एका कार्यशाळेचे आयोजन मध्यप्रदेशातील गरोठ (मंदसौर) येथे केले. या कार्यशाळेला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ६ आणि ७ जुलैला येथील बरखेडा गांगासा या गावातील माता दुधाखेडी या क्षेत्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना, हिंदुत्वनिष्ठांची आचारसंहिता कशी असावी ? लोकशाहीमधील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कसे लढावे? आदी विषयांवर मार्गदर्शन केले. समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी  प्रार्थना, स्वभावदोष निर्मूलनासाठी आवश्यक प्रयत्न, धर्मशिक्षणासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग आदी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष नामजप कसा करावा ? आध्यात्मिक उपाय या विषयांवर समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच साधनेची आवश्यकता आणि हिंदु राष्ट्र जागृतीसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम करावेत, या विषयांवर सनातन संस्थेचे साधक श्री. श्रीराम काणे यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या सत्रामध्ये  सर्व कार्यकर्त्यांनी ‘या कार्यशाळेद्वारे जीवनामध्ये साधनेचा नवा मार्ग मिळाला’, ‘आजपर्यंत अशा प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला कुठेच मिळाले नाही’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

क्षणचित्र : कार्यशाळेच्या ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे विविध विषयांवरील फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा लाभ कार्यकर्त्यांनी घेतला.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मपालन, साधना आणि पुरुषार्थ यांची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

चांगले पीक येण्यासाठी प्रथम भूमीमधील अनावश्यक तृण काढावे लागतात आणि मग ती नांगरावी लागते. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला धर्मपालन, साधना आणि पुरुषार्थ करणे आवश्यक आहे. साधना आणि पुरुषार्थ करून ईश्‍वराशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण समाजामध्ये हिंदु राष्ट्राची अपेक्षा करत आहोत. या हिंदु राष्ट्रमध्ये आपल्याला आदर्श व्यवस्था पाहिजे. ही व्यवस्था निर्माण करणारे आपण आहोत, त्यामुळे आपल्याला स्वतःकडून, घराकडून आणि गावाकडून प्रारंभ केला पाहिजे. महाराणा प्रतापांसारख्या योध्यांनी ज्या परिस्थितीमध्ये धर्मरक्षणाचा प्रयत्न केला तो आज कल्पनेच्या पलिकडे आहे; परंतु अशी वेळच आपल्यावर येऊ नये यासाठी आपल्याला प्रतिदिन धर्मरक्षण आणि त्यासाठी १ घंटा देण्याचा प्रयत्न करायला हवा.

महाराणा युवा संघाच्या कार्यकर्त्यांचे धर्मप्रेम !

या कार्यशाळेला उपस्थित महाराणा युवा संघाच्या बहुतेक कार्यकर्त्यांचे शिक्षण ९ वी ते १२ वी पर्यंत झालेले होते. हे कार्यकर्ते बांधकामाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. असे असतांनाही त्यांनी कार्यशाळेसाठी २ दिवसांचा वेळ काढला. हिंदु राष्ट्र आणि साधना हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रायोगिक सत्रामध्ये हिंदु राष्ट्राविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. महाराणा युवा संघाचे पदाधिकारीही निःस्वार्थपणे संघटना चालवत आहेत आणि यामुळे कार्यकर्तेही पदाधिकार्‍यांवर पूर्ण श्रद्धा ठेवून धर्मकार्यात सक्रीय होत आहेत.

या कार्यशाळेनंतर माता दुधाखेडी मंदिरामध्ये प्रतिमाहाच्या पहिल्या रविवारी सामूहिक आरती आणि धर्मशिक्षण वर्ग यांना प्रारंभ करण्याचे संघटनेकडून निश्‍चित करण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *