- गोमंतक हिंदू प्रतिष्ठान आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची फोंडा येथील शासकीय अधिकारी अन् पोलीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
- गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचीही मागणी
फोंडा (गोवा) : राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, तसेच हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्या बिलिव्हर्सच्या कारवायांना आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गोमंतक हिंदू प्रतिष्ठान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी १८ जुलै या दिवशी उपजिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांना देण्यात आले. मामलेदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयातही निवेदन देण्यात आले.
या वेळी गोमंतक हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र वेलींगकर, प्रतिष्ठानचे संरक्षक स्वामी श्री श्रद्धानंद, फोंडा तालुका समन्वयक श्री. विनय तळेकर, श्री. अभित शिरोडकर, अभिनव विकास फाऊंडेशनचे श्री. आनंद भारतु, गांजे येथील कला आणि सांस्कृतिक प्रगती मंचाचे श्री. रेशक गावकर, हिंदु जनजागृती समितीच्या कु. संगीता नाईक, सर्वश्री ब्रह्मानंद नाईक, मनोज गावकर, राकेश तेंडुलकर, माशाळ आडपईकर, हर्षल देवारी, विष्णु काणेकर, गौतम नाईक, कालिदास बांदोडकर, मोहन नाईक आणि धर्माभिमानी विद्या कळंगुटकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. फादर डॉम्निक आणि जोआन अवैधरित्या चालवत असलेल्या फाईव्ह पिलर चर्चमधून जिझसच्या नावाखाली लोकांचा बुद्धीभेद केला जात आहे. ते लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून अंधश्रद्धा पसरवत आहेत. फादर डॉम्निक आणि जोआन हिंदूंना त्यांच्या घरातील देवतांची चित्रे काढण्यास सांगत असल्याच्या अनेक तक्रारी गोमंतक हिंदू प्रतिष्ठानकडे आल्या आहेत. फाईव्ह पिलर चर्चमध्ये गरीब आणि गरजू लोकांच्या परिस्थितीचा अपलाभ घेत त्यांचे धर्मांतर केले जात आहे.
२. फादर डॉम्निक आणि जोआन एका तेलाद्वारे गंभीर आजार बरे करण्याचे आश्वासन देत आहेत. हे तेल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यास त्यांचा खोटारडेपणा उघडकीस येईल. घरोघरी जाऊन चर्चची सदस्य संख्या वाढवणे, त्यासाठी उपक्रम राबवणे आणि विविध आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणे आदी अवैध कृत्ये फादर डॉम्निक आणि जोआन करत आहेत.
३. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो; मात्र फाईव्ह पिलर चर्च हिंदूंचे धर्मांतर करून समाजात दुफळी निर्माण करून देशाची निधर्मी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फोंड्यातील यशोदा हॉल, तसेच शिरोडा आणि उसगाव या भागांत बिलिव्हर्सच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे त्यांच्या कारवाया बंद पाडाव्यात. यासंबंधी तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यात कायदा आणि सुवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
गुजरातप्रमाणे गोव्यातही धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा, याविषयीचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही लवकरच यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात