राजकीय हेतूने मंदिरे कह्यात घेणे आणि मंदिरातील संपत्तीचा वापर करणे चुकीचे !
सरकारच्या अयोग्य भूमिकेविषयी परखड आणि सत्य भूमिका ठामपणे मांडणारे दंडी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्यासारखे संतच धर्माचे खरे रक्षणकर्ते आहेत ! अशा संतमहंतांचा आदर्श घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी ही आता धर्मशास्त्रविसंगत निर्णयाच्या विरोधात आवाज उठवणे अपेक्षित आहे !
कोल्हापूर : वेतनावर पुजारी नेमणे हे अधार्मिक असून परंपरागत पुजार्यांनाच पूजेचा अधिकार आहे. महाराष्ट्र सरकारने मंदिरांविषयी जो निर्णय घेतला तो चुकीचा असून श्री महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भातील कायदा हाही मंदिरावर सरकारचे अतिक्रमण आहे. मी नुकताच पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलो. तेथेही वेतनावर पुजारी नेमले आहेत. त्यांना धर्मशास्त्राचे पुरेसे ज्ञान नाही आणि हे धर्माच्या विरोधी आहे. राजकीय हेतूने मंदिरे कह्यात घेणे आणि मंदिरातील संपत्तीचा वापर करणे चुकीचे आहे. मंदिराविषयी काही प्रश्न निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, असे मत पम्पाक्षेत्र (कर्नाटक) येथील दंडी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
(म्हणे) ‘पुजारी नेमण्याची प्रक्रिया चालूअसतांना हे स्वामी कुठून आले ?’ – महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
धार्मिक क्षेत्राविषयी मत व्यक्त करण्याचा अधिकार हा दंडी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना धर्म प्रदान करतो. याउलट धार्मिक क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नसतांना सरकार ते करत आहे !
श्री महालक्ष्मीदेवीला घागरा परिधान केल्यानंतर भाविकांचे आंदोलन तीव्र झाले आणि त्यानंतर सरकारने मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेतांना कायदा संमत केला. पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया चालू असतांना हे स्वामी कुठून आले ? त्यांचे येथे येणे आणि श्री महालक्ष्मी मंदिराविषयी काहीही माहिती नसतांना वादग्रस्त बोलणे हे शंकास्पद आहे, असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले आहे.