नुकतेच इस्रायल हे ‘ज्यू राष्ट्र’ आणि तेथील हिब्रू भाषेला ‘राष्ट्र भाषा’ म्हणून घोषित करण्यात आले. हे करत असतांना त्यासाठी तेथील संसदेत झालेला विरोधही सरकारने मोडून काढला. त्यापूर्वी ‘जेरुसलेम’ ही ज्यूंसाठी पवित्र असलेल्या भूमीला इस्रायलने राजधानी घोषित केले. मुळातच इस्रायल नाव म्हटले की, डोळ्यांसमोर येतो, तो लढवय्या इतिहास आणि इस्लाम अन् शांतीचे दूत म्हणवणारे ख्रिस्ती यांच्यापासून वाचवण्यासाठी सातत्याने करण्यात येत असलेले युद्ध, तसेच त्यात होणारा इस्रायलचा विजिगुषी वृत्तीचा विजय ! इस्रायलने स्वतःला ‘ज्यू राष्ट्र’ घोषित करण्याच्या वेळेपर्यंत हा संघर्ष चालूच होता आणि आहे. ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ज्यू नागरिकांसाठी ३ सहस्र वर्षांपासून पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. इस्रायलचा इतिहास आणि संघर्ष पाहिल्यास जेरुसलेमला स्वतःची राजधानी घोषित करणे, हे कसे महत्त्वाचे होते अन् त्या इतिहासातून आपण हिंदूंनी ‘भारतातील मंदिरे, तसेच त्याद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना कशी करता येईल’, हे शिकून कृतीप्रवण व्हायला हवे.
जेरुसलेमचा संघर्ष
जेरुसलेमच्या भूमीत पहिल्यांदा प्रेषित अब्राहम यांनी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षांपूर्वी एकेश्वराच्या पाया रचला. ‘ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीनही एकेश्वरवादी धर्मांचे मूळ अब्राहम यांच्या विचारांशी निगडित आहे’, असे म्हटले जाते. जेरुसलेममध्येच ज्यू धर्मियांची सर्वांत पवित्र समजली जाणारी ‘वेस्टर्न वॉल’ आहे. ही भिंत ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे, त्या डोंगरावरच ज्यूंचा पहिला राजा डेव्हिड यांचा मुलगा सॉलोमन याने पवित्र देऊळ बांधले. याच मंदिरात जगभरातील ज्यू वर्षातून तीनदा पवित्र दिवशी प्रार्थनेसाठी जमतात. आजही जगातील ज्यू धर्मीय प्रार्थना करतांना जेरुसलेमच्या दिशेने बघून करतात. इस्लामचे प्रेषित महंमद यांना ‘जेरुसलेम येथूनच ७ व्या स्वर्गापर्यंतचे दर्शन घडवले गेले’, असे मुसलमान मानतात. पूर्व जेरुसलेममध्ये मुसलमानांची मक्का आणि मदिना यानंतरची पवित्र वास्तू ‘मस्जिद ए अक्सा’ आहे. या काही कारणांमुळेही मुसलमानांनीही जेरुसलेमवर स्वतःचा अधिकार सांगितला. त्यावरून इस्रायल आणि जॉर्डन, सीरिया, इजिप्त या अरब राष्ट्रांशी युद्धही झाले आहे.
ज्यूंप्रमाणेच ख्रिस्ती धर्मियांसाठीही हे शहर तितकेच महत्त्वाचे आहे; कारण येशूने त्याच्या शिष्यांसमवेतचे शेवटचे भोजन याच शहरात घेतले होते. त्यानंतर त्याला मृत्यूदंड सुनावून याच शहरात क्रूसावर चढवण्यात आले. तद्पश्चात ज्या गुहेत त्याचे पार्थिव ठेवण्यात आले तेही याच शहरात आहे, असे म्हटले जाते आणि कालांतराने ते पार्थिव तिथून गायब झाले. त्यामुळे जगभरातील ख्रिस्ती धर्मियांच्या सगळ्याच पंथांसाठी जेरुसलेम येथील ‘चर्च ऑफ होली सेपलकर’ ही अत्यंत पवित्र जागा आहे. असा संघर्ष चालू असतांनाही ‘जेरुसलेम हे पहिल्यापासून स्वतःचेच आहे आणि त्यासाठी संघर्ष करावाच लागणार’, असे शिक्षण ज्यूंना पाठ्यपुस्तकातूनच दिले जाते. त्यामुळेच ख्रिस्ती आणि अरब राष्ट्रांचा स्वतःभोवती विळखा असतांनाही इस्रायलने स्वतःचा देश अन् जेरुसलेम स्वतःच्या अधीन ठेवत जेरुसलेमला राजधानी, तसेच इस्रायल ‘ज्यू राष्ट्र’ म्हणून घोषित केले.
हिंदु मंदिरांद्वारे हिंदु राष्ट्राची वाटचाल !
जेरुसलेम अर्थातच ‘वेस्टर्न वॉल’ आणि सॉलोमनचे पवित्र देऊळ स्वतःच्या अधीन ठेवण्यासाठी इस्रायलने केलेल्या संघर्षामागे ज्यूंची धार्मिक अस्मिता कारणीभूत आहे. धर्मासाठी आणि धार्मिक वास्तूंसाठी जगातील कोणत्याही शक्ती दोन हात करण्याची सिद्धता इस्रायलने दाखवली आणि त्यात तो यशस्वीही झाला. भारतात मात्र याच्या उलट होतांना दिसत आहे. सध्या देशात मंदिर सरकारीकरणाचे वारे वहातांना दिसत आहेत. शासनकर्त्यांनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. असे करतांना ‘धार्मिक अस्मिता टिकवणे अथवा या वास्तूंचे पावित्र्य जपणे’, अशा शुद्ध हेतू या कृतीमागे नक्कीच नाही. या मंदिरांमध्ये जे भाविकांकडून धन अर्पण होते, त्यावर राजकारण्यांचा डोळा आहे. त्यामुळे ‘देवस्थानांमध्ये भ्रष्टाचार होतो’, ‘भाविकांची लुबाडणूक होते’, अशी कारणे सांगून ही मंदिरे कह्यात घेतली जात आहेत. वास्तविक मंदिरे सरकारने कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार वाढला, अशी आकडेवारी सांगते.
भारतातील हिंदु राजकारण्यांमध्ये मंदिरांविषयी विशेष आस्था असणे अभिप्रेत आहे; कारण मागील सहस्रो वर्षे इस्लामी आक्रमकांनी भारतातील लाखो मंदिरे फोडली आणि बरीच मंदिरे मशिदीत रूपांतरित केली. असे करून हिंदूंच्या धार्मिक अस्मितेवर केलेला वार परतवून लावण्याची सुवर्ण संधी स्वातंत्र्यानंतर चालू आली; मात्र या ७० वर्षांत देहलीच्या सिंहासनावर बसणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना ‘निधर्मी’ ज्वराने ग्रासल्यामुळे हिंदूंचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. हे अल्प म्हणून कि काय आहे त्या मंदिरांचे सरकारीकरण करून आताचे शासनकर्ते हिंदु धर्माच्या मुळावर उठले आहेत. ‘कुठे मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांच्या तिजोरीवर डल्ला मारणारे भारतीय राजकारणी, तर कुठे धार्मिक अस्मितेपायी जेरुसलेमसाठी जिवाचे रान करणारे ज्यू’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे ! हिंदु राष्ट्रातच चैतन्याचे स्रोत असणार्या मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त होईल, हे निश्चित !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात