हिटणी नाका (गडहिंग्लज-संकेश्वर सीमेजवळ) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी हिटणी नाका (गडहिंग्लज-संकेश्वर सीमेजवळ) येथे कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मनोज पोवार आणि श्री. सागर कुराडे, शिवसेना शहरप्रमुख श्री. अशोक शिंदे, सर्वश्री वसंत नाईक, राजू पोवार, समीर रेडेकर, सागर मांजरेकर, राहुल खोत, तानाजी जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती यांसह १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
२१ जुलैला पू. भिडेगुरुजी यांचे संकेश्वर येथे ‘सुवर्ण सिंहासनाचा इतिहास’ यावर व्याख्यान होणार होते. पू. भिडेगुरुजी यांच्या भाषणामुळे जातीय तेढ निर्माण होऊ नये, म्हणून ही प्रवेशबंदी घोषित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या बेळगाव जिल्हा बंदी आदेशात तेथील जिल्हाधिकार्यांनी असे कारण दिले की, कोरेगाव भिमा प्रकरणी पू. भिडेगुरुजी हेच अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहेत, असा दलित संघटनांचा समज असून या प्रकरणी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद आहे. यामुळे दलित संघटनांमध्ये अस्वस्थता असून त्यांच्या भाषणामुळे दलित संघटना आंदोलन करून शकतात आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत कोरेगाव भिमा प्रकरणात पू. भिडेगुरुजी यांचा हात असल्याचे दिसून येत नाही’, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. असे असतांना जिल्हाधिकारी केवळ नोंद झालेल्या खोट्या गुन्ह्यावरून त्यांच्यामुळे कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकते, असे कसे म्हणू शकतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी नि:स्वार्थीपणे कार्य करणार्या पू. भिडेगुरुजी यांना जिल्हाबंदी अनाकलनीय ! – अजित धुळाज, हिंदु जनजागृती समिती
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजी हे तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य रुजावे यांसाठी वयाच्या ८५ व्या वर्षीही अविरतपणे कार्यरत आहेत. पू. भिडेगुरुजी यांच्यामुळेच शिवप्रभूंचा हिंदवी स्वराज्याचा विचार आज तळागाळापर्यंत पोहोचला आहे. गडकोट मोहीम, श्री दुर्गादौड यांसह अनेक उपक्रमांमुळे आज तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होत आहे. कोरेगाव भिमा प्रकरणात पू. भिडेगुरुजी यांचा दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्याचे भांडवल करत कर्नाटक सरकारने गुरुजींना जिल्हाबंदी करणे अनाकलनीय आहे. याच समवेत श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनाही गोवा सरकारने गोवा राज्यबंदी केली आहे. अशाप्रकारे हिंदुत्वनिष्ठांचा त्रास देण्याच्या देशाव्यापी षड्यंत्राचा शोध घेतला पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात