कटक (ओडिशा) येथे ओडिशा सुरक्षा सेना कार्यालयात हिंदूसंघटन बैठक
राऊरकेला (ओडिशा) : आज राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेली आक्रमणे अन् हिंदु समाजाची निष्क्रीयता लक्षात घेता प्रत्येक हिंदूला ज्ञानशक्ती आणि आध्यात्मिक बळ यांची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी कटक येथे ओडिशा सुरक्षा सेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदूसंघटन बैठकीत केले.
ओडिशा सुरक्षा सेनेचे अध्यक्ष श्री. अभिषेक जोशी यांनी त्यांच्या संघटनेच्या पदाधिकार्यांसाठी या बैठकीचे आयोजन केले होते. श्री. मालोंडकर यांनी या वेळी धर्म आणि राष्ट्र यांवर होत असलेले आघात, त्यानुषंगाने धर्मशिक्षणाची आणि धर्माचरणाची आवश्यकता, संघटित होण्याची आवश्यकता, समिती यासंदर्भात करत असलेले कार्य आदींची माहिती ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून दिली. तसेच हिंदूंच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे महत्त्व विषद केले. गोवा येथे झालेल्या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ची क्षणचित्रांची ध्वनीचित्रफीतही या वेळी दाखवण्यात आली.
श्री. अभिषेक जोशी यांनी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदूसंघटनाच्या कार्याविषयी प्रशंसोद्गार काढून ‘हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात आमचे सहकार्य आणि सहभाग अवश्य राहील’, असे आश्वासन देऊन सेनेच्या कार्याचा परिचय करून दिला.