चेन्नई : येथे शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी विशेष करून गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर येथे एक विशेष सत्संग आयोजित केला होता. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारत हिंदू मुन्नानी, हिंदू मक्कल मुन्नानी आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या सदस्यांनाही त्यांनी आमंत्रित केले होते.
सत्संगाचा प्रारंभ श्री गणेशाच्या प्रार्थनेने झाला. त्यानंतर समितीच्या विविध कार्याची माहिती देणार्या ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या. श्री. जयकुमार यांनी साध्या उदाहरणासह जीवनामध्ये असलेले साधनेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. सौ. कल्पना बालाजी यांनी ‘जीवनात श्रीगुरूंचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा’ याविषयी माहिती दिली. त्यानंतर सौ. सुगंधी यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी साधना किती आवश्यक’ याविषयी सांगितले. त्यांनी प्रश्नोत्तर सत्रात जिज्ञासूंच्या शंकांचे समाधान केले. सौ. सुदा गोपालकृष्णन् आणि कु. नित्यश्री यांनी ग्रंथप्रदर्शन सेवा केली. या कार्यक्रमात जवळजवळ २० धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.
क्षणचित्रे
१. वरील सत्संग नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा चालू झाल्याने श्री. राधाकृष्णन् यांनी सत्संगानंतर लगेच क्षमायाचना केली. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन न केल्याची उपस्थित धर्माभिमान्यांना जाणीव झाली.
२. सत्संग संपल्यावर श्री. आर्.डी. प्रभु यांनी त्यांच्या भारत हिंदू मुन्नानीच्या १० सदस्यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांशी परिचय करून दिला. या कार्यकर्त्यांनी अनेक गोष्टी शिकण्यासाठी रामनाथी आश्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
३. कार्यक्रमाचे शेवटी श्री. राधाकृष्णन् आणि श्री. आर्.डी. प्रभु यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होण्याचे त्यांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी हिंदु जनजागृती समितीकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन केले.