सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – सुधीर बहिरवाडे, हिंदु महासभा शहर उपाध्यक्ष
सोलापूर : सरकार केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात का घेत आहे, अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेण्याचे धारिष्ट्य सरकार करत नाही. हीच का सरकारची धर्मनिरपेक्षता ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे, त्याकडे सरकारचे लक्ष नाही; पण हिंदूंच्या मंदिरांतील पैशांवर मात्र डोळा आहे. सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा, अशी मागणी येथील जिल्हा परिषद, मुख्य प्रवेशद्वार येथे करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदु महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी केली. आंदोलनात ‘हज हाऊस’ला हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपू सुलतानचे नाव देऊन त्याचे उदात्तीकरण करणारा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी पद्मशाली पुरोहित संघाचे श्री. बालराज दोंतुल, सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे, सौ. राजश्री देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री. विठ्ठल नोरा, श्री. आप्पा गवळी, श्री. कृष्णा रायचुरकर, श्री. आकाश श्रीराम, योग वेदांत सेवा समितीचे श्री. विठ्ठल गरड, हिंदु महासभेचे विनायक पाटील यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
श्री. बहिरवाडे पुढे म्हणाले की, सरकारने मंदिर सरकारीकरणाचे धोरण न पालटल्यास वर्ष २०१९ च्या निवडणुकीत याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. सरकारने मंदिरे कह्यात घेण्याऐवजी शासकीय कामकाज योग्य होण्याकडे लक्ष द्यावे.