Menu Close

उल्हासनगर : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने अस्लम अन्सारीने केली हर्षची हत्या

उल्हासनगर : येथे गेल्या आठवड्यात ११ वर्षीय हर्ष अल्हाट याची हत्या झाली होती. परिसरातील एका तरुण आणि तरुणीचे शारीरिक संबंध हर्षने पाहिल्याने, ही घटना जगजाहीर होण्याच्या भीतीने अस्लम अन्सारी (२२) या आरोपीने त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी फरार आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. पोलिसांनी कसून तपास करत आठवडाभरातच या हत्येचा छडा लावला आहे.

गेल्या आठवड्यात, १७ जुलै रोजी उल्हासनगर कॅम्प क्र. पाच परिसरातील गणेशनगर भागात राहणारा हर्ष गायब झाला होता. त्याचा शोध घेतला असता, त्याचे आई-वडील काम करत असलेल्या एका जिन्स कारखान्याच्या शेजारीच हर्षचा गळा चिरलेला मृतदेह सापडला होता. हर्षच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्या घरात हत्या झाली होती, तिथे १६ कामगार राहत होते. त्यातील दोघे हत्या झाल्याच्या दिवसापासून फरार होते. पोलिसांनी याच घरातील अन्य कामगारांकडे कसून चौकशी केली असता, या घरातील अस्लमबाबत पोलिसांना कळले. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही अस्लम त्या मुलाचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांची पथके विविध ठिकाणी अस्लमचा शोध घेत होती. त्यात अस्लम हा बिहारजवळील नेपाळ सीमेवरून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अस्लमला अटक करत त्याची चौकशी केली असता, अस्लम आणि त्याच्या प्रेयसीचे शरीरसंबंध हर्षने पाहिले होते. याबाबत हर्ष सगळ्यांना सांगेल, या भीतीने अस्लमने १७ जुलै रोजी हर्षचे अपहरण केले आणि अस्लम राहत असलेल्या घरातच सुरीने हर्षची गळा चिरून हत्या केल्याची कबुली अस्लमने दिली. अस्लमला न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त अंकीत गोयल यांनी दिली.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *