गोव्यात झालेल्या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’तून प्रेरणा !
भोपाळ (मध्यप्रदेश) : येथील लालघाटी क्षेत्रातील मानस उद्यानामध्ये २२ जुलैला एक दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. रामनाथी, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद यादव सहभागी झाले होते. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी येथे सदर कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. श्री. सतीश अहिरवार यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.
१. समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘नामजप कोणता आणि कसाकरावा ?’ याविषयी मार्गदर्शन केले
२. श्री. श्रीराम काणे यांनी ‘जीवनामध्ये साधनेचे महत्त्व’ आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक विविध उपक्रम’ यांविषयी माहिती दिली. श्रीमती संध्या आगरकर यांनी ‘प्रार्थनेचे महत्त्व’, तसेच ‘दिवसभर विविध कृती करतांना प्रार्थना आणि ईश्वराच्या अनुसंधानात कसे रहायचे ?’ हे प्रयोगाद्वारे सांगितले.
हिंदु राष्ट्रामध्ये इंग्रजी नव्हे, तर गुरुकुल शिक्षणपद्धत असेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
आज इंग्रजी शिक्षण प्रणालीमध्ये प्रथम ‘डोनेशन’ द्यावे लागते. नंतर ‘अॅडमिशन’ मिळते आणि शेवटी ‘एज्युकेशन’ मिळते. गुरुकुल पद्धतीमध्ये पहिला प्रवेश, नंतर शिक्षण आणि शेवटी गुरुदक्षिणा द्यायची असते. हिंदु राष्ट्रामध्ये इंग्रजी नव्हे, तर गुरुकुल शिक्षणपद्धत असेल. पूर्वी भारतात तक्षशिला, नालंदा आदी विश्वविद्यालये होती. संपूर्ण जगातून तेथे १० सहस्रांहून अधिक विद्यार्थी १४ विद्या आणि ६४ कला शिकण्यासाठी येत होते. वर्ष २०२३ मध्ये भारतातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये हिंदु राष्ट्र येईल. हे कालमाहात्म्यानुसार होणार आहे. ‘धर्मरक्षक’ संघटनेचे कार्यकर्ते या कार्यशाळेमध्ये आहेत, ते अत्यंत भाग्यवान आहेत. त्यांना देवाने या कार्यासाठी निवडले आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते हिंदु राष्ट्राची स्थापन करू शकतात.
जागृत हिंदू झाल्यावर आपल्याला काय करायचे, हे शिकायचे आणि शिकवायचे आहे ! – विनोद यादव
सध्या सामाजिक माध्यमांतून हिंदू जागृत होत आहेत; मात्र पुढे काय करायचे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला हिंदु धर्माविषयी आवश्यक माहिती घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी विविध उपक्रम शिकावे लागतील. सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते देशभरात हे जागृती अभियान चालवत आहेत. आपल्याला खारीचा वाटा उचलून यात सहभागी व्हायचे आहे.