Menu Close

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’चे आयोजन

विविध अनुमत्यांसाठी एक खिडकी योजना चालू करण्यास सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

डावीकडून गिरीश धोकिया, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता विवेक भावे, आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके आणि सौ. वेदिका पालन

कल्याण : धार्मिक उत्सव म्हणजे हिंदूंच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. लोकांनी सार्वजानिक उत्सव हौस म्हणून नव्हे, तर उत्सव म्हणून साजरे करायला हवेत. उत्सवात धर्माचरण केल्यास त्याचा लाभ आपल्यालाच होणार आहे. सार्वजनिक उत्सव साजरे करतांना मंडळांना सातत्याने अग्नीशमन दल, पोलीस आणि महानगरपालिका अशा अनेक अनुमत्यांसाठी विविध ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अनेक वेळा मंडळांना त्याचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी शासनाने ‘एक खिडकी योजना’ राबवावी यासाठी आपण सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता विवेक भावे यांनी केले. येथील पश्‍चिम भागातील ‘नवजीवन फाउंडेशन’ येथे २९ जुलै या दिवशी सायंकाळी ५.०० ते ८.३० या वेळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या शिबिराला कल्याण येथील सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक वंदनीय श्री मोडक महाराज यांनी आशीर्वादपर संदेश दिला.

कार्यक्रमाचा आरंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. २४ मंडळांचे प्रतिनिधी, २ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि २६ धर्माभिमानी यांनी शिबिराचा लाभ घेतला. शेवटच्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली होती. या गटचर्चेत अनेकांनी स्वत:चे कटू आणि चांगले अनुभव सांगितले. यासह आदर्श गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटनही करणार असल्याचे तसेच धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण करणार असल्याचेही सांगितले.

हिंदु संस्कृतीप्रमाणे उत्सव साजरे केले, तरच समाजासह स्वत:लाही लाभ होणार ! – अभिजीत भोजणे, हिंदु जनजागृती समिती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सव चालू केले. त्या माध्यमातून अनेक क्रांतीकारक निर्माणही झाले. आज गणेशोत्सव हे स्पर्धा म्हणून साजरे केले जात आहेत. आज जी आरास केली जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो; पण त्याचा आपल्याला काहीच लाभ होत नाही. हिंदु संस्कृतीप्रमाणे उत्सव साजरे केले तरच समाजासह स्वत:लाही लाभ होणार आहे. सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्याप्रमाणे त्याचे पावित्र्य राखायला हवे. असे केल्यासच ईश्‍वराची कृपा होईल.

सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून संघटितपणे धर्मकार्य करण्याची वेळ आली आहे ! – गिरीश धोकिया, अध्यक्ष, दूधनाका गणेशप्रेमी मंडळ

लोकमान्य टिळकांनी एकजूट होण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सांगितला होता. आज आपण तसा साजरा करत आहोत का, याचा अभ्यास करायला हवा. आज देशाची परिस्थिती बिकट असून हिंदु धर्म मोठ्या संकटात आहे. त्यासाठी आपण सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून संघटितपणे धर्मकार्य करण्याची वेळ आली आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी आपण शाडूच्या मातीपासूनच बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करूया, तर गणेशोत्सवात मोठमोठ्याने गाणी लावणे, मद्यपान करणे, अंगविक्षेप करत नृत्य करणे, जुगार खेळणे असे अपप्रकार टाळून धर्माचरण करत आदर्श गणेशोत्सव साजरे करून सर्वांसमोर आदर्श ठेवूया असे आवाहन श्री. गिरीश धोकिया यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीने राबवलेली चळवळ उत्सवाच्या माध्यमातून पुढे नेऊन लोकांसमोर आदर्श निर्माण करूया ! – बाळा परब, रामबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मंडळांच्या माध्यमातून अनेक धार्मिक उपक्रम राबवले जातात. या माध्यमातून आपण आपली संस्कृती जपायला हवी. आनंद मिळण्यासाठी उत्सव साजरे करायला हवेत; पण आज त्यात विकृतींनी शिरकाव केला आहे, ही खेदाची गोष्ट आहे. हिंदु संस्कृती जगात महान असतांना आपण उत्सव कशा पद्धतीने साजरे करतो याचा अभ्यास करायला हवा. आज हिंदु जनजागृती समिती राबवत असलेली ही चळवळ अभिमानास्पद आहे. समिती ही सर्व मंडळांसाठी आधारस्तंभ म्हणून उभी आहे. हिंदु जनजागृती समितीने राबवलेली चळवळ आपण उत्सवाच्या माध्यमातून पुढे नेऊया आणि लोकांसमोर आदर्श निर्माण करूया.

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंकडून नकळत विकृती घडत असतात ! – आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष

धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंकडून नकळत विकृती घडत असते. आज बळजोरीने लोकांकडून वर्गणी गोळा केली जात आहे. ही एकप्रकारे खंडणी गोळा केल्यासारखेच आहे. स्त्रियांकडे पाहून अंगविक्षेप करणे हा एकप्रकारे विनयभंगच आहे. तसेच मिरवणुकीत मद्यपान करणे, मंडपात जुगार खेळणे यांसारखे प्रकार पहायला मिळतात. त्यामुळे आपल्यावर निर्बंध येत आहेत. गणपति ही बुद्धीची देवता आहे. मग विनाशकारक बुद्धी का आली ?, याचा अभ्यास आपण करायला हवा. आपल्यातील भेदभाव विसरून एकत्र येऊन आदर्श गणेशोत्सव साजरा करायला हवा.

मंडळांच्या माध्यमातून धर्मजागृतीचे आणि धर्मरक्षणाचे कार्य करायचे आहे ! – शंभू गवारे, प्रवक्ते, सनातन संस्था

पुढील काळात एकत्र येण्याची आवश्यकता आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यात आपण आपला खारीचा वाटा उचलून धर्मकार्यात सहभागी होऊया. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या विरोधात लोकांच्या मनात असलेला असंतोष संघटित केला. आपल्याला मंडळांच्या माध्यमातून धर्मजागृतीचे आणि धर्मरक्षणाचे कार्य करायचे आहे.

सार्वजनिक मंडळांना एकत्र आणण्याचा उपक्रम पुष्कळ कौस्तुकास्पद आहे ! – वंदनीय श्री मोडक महाराज, संस्थापक सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, कल्याण पश्‍चिम

तुम्ही सार्वजनिक मंडळांना एकत्र आणण्याचा जो उपक्रम हातात घेतला आहे, तो उत्कृष्ट आणि कौतुकास्पद आहे. माझ्याही मनामध्ये अशाच प्रकारे मंडळांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होत होते. विलंबाने का होईना; पण तुमच्या माध्यमातून भगवंतच हे कार्य करून घेत आहेत. त्याविषयी मला पुष्कळ आनंद आहे. मंडळाच्या माध्यमातून जे चुकीचे प्रकार चालतात त्याविषयी प्रबोधन करणे, उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करायला हवेत. या माध्यमातून हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे, आणि सर्व मंडळांमध्ये एकी निर्माण व्हावी, असे मला वाटते. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !

आजचे हिंदू धर्माचरण करत नाहीत. आई-वडील मुलांवरती संस्कार करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आजची पिढी धर्मासंदर्भात संस्कारहीन होत चालली आहे. अशीच परिस्थिती चालू राहिली, तर लवकरच आपण अल्पसंख्यांक होत जाऊ. हे पालटण्यासाठी धर्माचरण करण्याची आवकता आहे. जन्महिंदू न रहाता आपण धर्माचरणी होऊन धर्माभिमानी हिंदू घडायला हवे. त्यातूनच आपल्या पुढील पिढीचे आणि संस्कृतीचे रक्षण करू शकतो. त्यासाठी प्रत्येकानेच काही बंधने पाळणे आवश्यक आहे. आपण धर्माचरणासाठी काही बंधने पाळली, तरच आपल्या पुढील पिढीमध्ये धर्माभिमान निर्माण होईल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *