स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अपर जिल्हादंडाधिकार्यांचे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना योग्य ती कृती करण्यासाठी परिपत्रक !
सांगली : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० जुलै या दिवशी सांगली जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. याची नोंद घेत अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यांसाठी सर्व स्तरावरून योग्य त्या सूचना द्याव्यात, तसेच राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी व्यापक स्तरावरून प्रसिद्धी द्यावी, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक पोलीस अधीक्षक सांगली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांना संगणकीय पत्राद्वारे पाठवले आहे. या अध्यादेशासमवेत समितीचे निवेदन, तसेच या संदर्भात शासनाने काढलेले विविध अध्यादेशही जोडले आहेत.
या परिपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय समारंभ विविध आस्थापन, तसेच सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करून साजरे करण्यात येतात. या दिवशी कागदी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. केंद्रशासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या ध्वजास मान्यता नाही. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रभक्ती आणि उत्साहापोटी हे ध्वज विकत घेतात; मात्र सदरचे ध्वज कार्यक्रमानंतर इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तरी आपल्या अखत्यारित येणार्या सर्व संबंधित संस्था आणि शैक्षणिक संस्था यांना सूचना द्याव्यात.