- बांगलादेशातील सत्तेत असलेले धर्मांध मंत्रीच हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना धमकावत असतील, तर तेथील धर्मांध हे हिंदूंचे काय हाल करत असतील, याचा विचारही न केलेला बरा !
- बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांच्या जिवावर तेथील सत्ताधारी उठले असतांना काहीही न करणारे भाजप सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुहित काय साधणार ?
- ‘मुसलमानबहुल देशात हिंदूंवर कसे अत्याचार होतात’, हे भारतातील पुरोगामी जाणतील का ?
ढाका : बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारी संघटना ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीनच बांधण्यात येत असलेल्या घरावर २५ मार्च २०१८ या दिवशी १०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून तोडफोड आणि लुटालूट करून प्रचंड प्रमाणात हानी केली होती. या प्रकरणी समेट करण्यासाठी बांगलादेशाचे अन्नमंत्री अधिवक्ता कमरूल इस्लाम यांनी अधिवक्ता रवींद्र घोष यांना त्यांच्या ढाका येथील अधिकृत निवासस्थानी पाचारण केले होते. बांगलादेशाचे गृहमंत्री असदुझम्मान खान कमाल यांनी केलेल्या सूचनेवरून अधिवक्ता घोष १ ऑगस्ट २०१८ या दिवशी अधिवक्ता कमरूल इस्लाम यांना भेटण्यास गेले; मात्र येथे त्यांना इस्लाम यांच्याकडून धमक्या देण्यात आल्या.
१. प्रारंभी अधिवक्ता घोष यांनी त्यांच्या घरावर २५ मार्च २०१८ या दिवशी तसेच नंतर २० मे या दिवशीही झालेल्या आक्रमणाविषयी आणि या आक्रमणाची पोलिसात तक्रार नोंदवल्यावरही आतापर्यंत आरोपींना अटक न झाल्याविषयी खेद व्यक्त केला. त्या वेळी त्यांनी अन्नमंत्र्यांनी आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करून हानीची भरपाई मिळावी आणि आरोपींना कायद्याप्रमाणे अटक करून शिक्षा द्यावी, अशी विनंती केली.
२. या वेळी अन्नमंत्री इस्लाम अधिवक्ता घोष यांच्याशी रागाने बोलू लागले. ‘ते सर्व आरोपी माझी माणसे असून त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याआधी तुम्ही मला भेटावयास पाहिजे होते. माझ्या अनुमतीविना माझ्या मतदारसंघात घर कसे बांधता ? जर तुम्ही बांधकाम चालू केले, तर माझी माणसे ते बांधकाम १० वेळा पाडून टाकतील.’ अशा शब्दांत अन्नमंत्री अधिवक्ता कमरूल इस्लाम यांनी अधिवक्ता घोष यांना धमकावले.
३. अधिवक्ता घोष यांना यापूर्वीही कायद्याची कार्यवाही करणार्या व्यक्ती, शासकीय अधिकारी, धर्मांध इत्यादींच्या धमक्या, तसेच शिवीगाळ यांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात